मिरजेतील गॅस्ट्रोची साथ अद्याप कायम असून बुधवारी आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ९ झाली आहे. महापालिकेने रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रीस पूर्णपणे मनाई केली असून कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. अध्रे मिरज शहर गॅस्ट्रोने गेल्या दहा दिवसांपासून झुंजत असून प्रशासन मात्र केवळ पाण्याची चाचणी व कागदी घोडे नाचवीत आहे. मृत्यू पावणारे रुग्ण कसे अन्य कारणांनचे मयत झाले असल्याचे दर्शविण्याचा आरोग्य विभागाचा आटापिटा सुरू असून साथीला पायबंद घालण्यात अपयश आले आहे.
बुधवारी एका खाजगी रुग्णालयात चार दिवसांपासून दाखल असलेल्या महेश कुरणे या ५५ वर्षांच्या इसमाचे निधन झाले, तर रेवणी गल्लीत राहणाऱ्या रामचंद्र नाईक, वय ५८ याचा जुलाब उलटीने राहत्या घरी मृत्यू झाला. कुरणे हे म्हैसाळ येथील युनियन बँकेत रोखपाल म्हणून काम करीत होते. शुक्रवारी त्यांना जुलाब उलटय़ा सुरू झाल्याने खाजगी रग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
शहराला होणाऱ्या दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची साथ पसरली असून शासकीय रुग्णालयाबरोबरच खाजगी रुग्णालयात मोठय़ा प्रमाणावार रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. मंगळवारी आरोग्य विभागाने महासव्‍‌र्हेक्षण केले, नळ पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी घेतले. मात्र अहवाल तयार करण्यातच अधिकाऱ्यांचा वेळ जात असून प्रत्यक्ष साथ काबूत आणण्यासाठी यंत्रणा सक्षम झाल्याचे कुठेही आढळून येत नाही.
शहरात उघडय़ावरील खाद्य पदार्थ विक्रीस मनाई करण्यात आली असून हातगाडीवर पदार्थ विकण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. लक्ष्मी मार्केट, गांधी चौक, कर्मवीर चौक, मध्यवर्ती बसस्थानक परिसरात लावण्यात येणारे हातगाडे बंद करण्यात आले असून महापालिकेचे कर्मचारी सायंकाळी हातगाडय़ांना प्रतिबंध करीत आहेत.