राज्यातील ९० साखर कारखान्यांकडे आयकर विभागाची ५ हजार ४०० कोटीची थकबाकी असून या थकबाकीच्या वसुलीसाठी आयकर विभागाने राज्यातील सर्व सहकारी साखर कारखान्यांना नोटिसा पाठविल्या आहेत. इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याला १३७ कोटी ८३ लाख आयकर भरण्याचे या नोटिशीद्वारे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पाटील म्हणाले, सन २००८- ०९ ते २०१२- १३ या काळातील गाळप हंगामापर्यंत ९० साखर कारखान्यांना उत्पादन खर्चावर आधारित किंमतीपेक्षा (एफ.आर.पी.) अधिक रक्कम सभासदांना, उस उत्पादकांना दिल्याने हा कारखान्याचा नफा ग्राहय धरून एकूण नफ्याच्या ३० टक्के रक्कम भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सध्या राज्यातील सर्व सहकारी कारखाने साखरेचे बाजार घसरल्याने अत्यंत अडचणीच्या काळातून चालले आहेत. आयकर विभागाने पाठविलेल्या थकबाकीची रक्कम कोणताही कारखाना भरू शकत नाही, कारण या नफ्याचे सर्व वाटप ऊस उत्पादकांना करण्यात आले आहे. वास्तविक पाहता या प्रकरणात अर्थमंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याची गरज आहे. ही रक्कम भरण्याची कोणत्याही कारखान्याची ऐपत नाही. या प्रकरणी स्थगिती मागण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.