लोकसत्ता प्रतिनिधी सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बार्शी येथे शेतकरी संवाद मेळाव्याच्या निमित्ताने गेल्यानंतर आपल्या जुन्या सहकाऱ्यांच्या घरी जाऊन आस्थेवाईकपणे विचारपूस केली. ९० वर्षांच्या माजी आमदार प्रा. प्रभाताई झाडबुके यांच्या निवासस्थानी गेल्यानंतर त्यांनी ८४ वर्षांच्या शरद पवार यांना राखी बांधून त्यांचे हृद्य औक्षण केले. यावेळी पवार यांच्या लाडक्या बहिणीची चर्चा सुरू झाली. प्रा. झाडबुके शरद पवार यांच्या ५५ वर्षांपासूनच्या एकनिष्ठ सहकारी मानल्या जातात. १९६२ आणि १९६७ अशा सलग दोनवेळा त्या बार्शी विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. उत्कृष्ट वक्त्या म्हणून त्यांना प्रसिध्दी मिळाली होती. काँग्रेसमधून शरद पवार बाहेर पडल्यानंतर प्रा. झाडबुके त्यांच्या सोबत निष्ठेने उभ्या होत्या. आणखी वाचा- देवेंद्र फडणवीस आरक्षण देणार नसतील तर त्यांच्याशी भांडण करावे लागेल – मनोज जरांगे पाटील पवार यांच्या तत्कालीन समाजवादी काँग्रेसतर्फे १९८० साली सोलापूर लोकसभा निवडणुकीत त्यांना पवार यांनी उभे केले होते. वयोपरत्वे शरीर साथ देत नसल्यामुळे प्रा. झाडबुके सक्रिय राजकारणात नाहीत. परंतु त्यांचा पवार यांच्याशी असलेला जिव्हाळा आजही कायम आहे. त्याच जाणिवेने पवार बार्शीत आल्यानंतर प्रा. झाडबुके यांच्या निवासस्थानी गेले असता राखी पौर्णिमेला आठवडा अवकाश असताना प्रा. झाडबुके यांनी थरथरल्या हातांनी शरद पवार यांना राखी बांधून त्यांचे औक्षण केले. बार्शीच्या भेटीत पवार यांनी आपले पूर्वाश्रमीचे जुने सहकारी, माजी मंत्री दिलीप सोपल आणि रामचंद्र सोमाणी यांच्याही निवासस्थानी जाऊन त्यांची आस्थेने विचारपूस केली.