मेळघाटात गंभीर तीव्र कुपोषित (मॅम) आणि मध्यम तीव्र कुपोषित (सॅम) बालकांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाल्याचे समाधान आरोग्य यंत्रणेला असले, तरी गेल्या चार महिन्यांमध्ये ९१ बालमृत्यू झाल्याने ‘नवसंजीवनी’ योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. आरोग्य विभागाच्या ताज्या अहवालानुसार मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यात एप्रिल ते जुलै या चार महिन्यांमध्ये शून्य ते सहा वष्रे वयोगटातील ९१ बालके दगावली. त्यातील ६२ बालके आपला पहिला वाढदिवसही साजरी करू शकली नाहीत. १ ते ५ वष्रे वयोगटातील २६ बालकांचा अकाली मृत्यू झाला.
एकात्मिक बालविकास सेवा (आयसीडीएस) आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने मेळघाटात विविध योजना राबविण्यात येतात. राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशन अंतर्गत जे उपक्रम सुरू करण्यात आले, त्याचा काही अंशी फायदादेखील झाला.
ग्राम बालविकास केंद्रात दाखल करण्यात आलेल्या गंभीर तीव्र कुपोषित बालकांपैकी ७० ते ८० टक्के बालकांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे दिसूनही आले. जुलै २०१२ मध्ये गंभीर तीव्र कुपोषित बालकांची संख्या ३२९ होती, ती जुलै २०१३ मध्ये ३१६ पर्यंत कमी झाली आहे. मध्यम तीव्र कुपोषित बालकांच्या संख्येतही २ हजार ३२० हून १ हजार ८१९ पर्यंत घट झाली आहे.कमी वजनाच्या बालकांच्या संख्येतही सातत्याने होणारी घट दिलासा मिळवून देणारी असली, तरी बालमृत्यूदर कमी न होणे ही चिंताजनक बाब बनली आहे. मेळघाटात कुपोषणाचे प्रमाण राज्य सरासरीपेक्षा जास्त असल्याने उपाययोजना सुचवण्यासाठी २०१० मध्ये उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली. कुपोषणाची जटिल समस्या सोडवण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये संवेदनशीलता आणण्याविषयी सूचना त्या वेळी देण्यात आली होती, पण अजूनही सरकारी यंत्रणा आणि आदिवासी कुटुंबामधील दरी कमी झालेली नाही. कुपोषणाची तीव्रता आणि बालमृत्यूंसाठी आरोग्य यंत्रणा स्थानिक आदिवासींना जबाबदार ठरवते, तर कर्मचाऱ्यांच्या वागणुकीमुळे आदिवासींचा शासकीय आरोग्य सेवेवर विश्वास बसलेला नाही, हा निष्कर्ष ‘कुपोषण देखरेख समिती’च्या अहवालात काढण्यात आला आहे. मार्च २०१२ ते मार्च २०१३ या कालावधीत मेळघाटात ४०८ बालमृत्यू झाले, त्यापैकी सर्वाधिक २२४ बालमृत्यू घरी झाले आहेत. त्यांना उपचाराची संधीदेखील उपलब्ध झाली नाही. तब्बल ९० बालमृत्यू हे ग्रामीण किंवा उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उपचारादरम्यान झाले आहेत. यातील ४१ बालके तर रस्त्यातच दगावली आहेत.

अनेक कारणे जबाबदार
मेळघाटात अजूनही रस्त्यांचे परिपूर्ण जाळे विकसित झालेले नाही. पावसाळ्यात तर अनेक गावांचा संपर्क तुटलेला असतो. आरोग्य यंत्रणनेने फिरत्या आरोग्य पथकाची सज्जता ठेवली आहे, तरी त्यांच्या कार्यक्षेत्राला मर्यादा आहेत. धारणी तालुक्यातील साद्राबाडी आणि कळमखार तसेच चिखलदरा तालुक्यातील सेमाडोह, टेंब्रूसोडा आणि सलोना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेतील गावांमध्ये बालमृत्यूंचे प्रमाण अधिक आहे. या गावांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. कुपोषित बालकांची काळजी घेण्याची जबाबदारी ही आयसीडीएस पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविकांवर आहे. पण अजूनही ही यंत्रणा दुर्लक्षित आहे. त्यांना तुटपुंज्या पगारावर विपरीत परिस्थितीत काम करावे लागते. मेळघाटात ४४९ अंगणवाडय़ा मंजूर आहेत, त्यापैकी ४२५ कार्यरत आहेत. १७४ अंगणवाडय़ांमध्ये तर स्वच्छतागृहाचीही व्यवस्था नाही.