अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष ठाले पाटील यांची माहिती

औरंगाबाद : ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्येच घ्यायचे ठरले आहे, पण करोनाचा प्रभाव ओसरल्यानंतर, असे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील व संमेलनाचे प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले. मात्र, तारखा अनिश्चित असून याच वर्षांत – २०२१ मध्येच संमेलन घेतले जाईल, असे ठाले पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

नाशिकमध्ये संमेलन घेण्यावरून आणि त्यावर होणाऱ्या खर्चावरून बराच खल झालेला आहे. नियोजनापूर्वीच संमेलनाला वादाचा रंग येऊ लागला होता. या पार्श्वभूमीवर मंगळवारी औरंगाबादेत नाशिकमध्येच संमेलन घेण्यात येण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या संदर्भाने सहा प्रमुख मुद्दय़ांवर महामंडळाचे पदाधिकारी व संमेलनाच्या स्वागत मंडळाच्या समिती प्रमुखांमध्ये चर्चा झाली. या चर्चेत नाशिककरांना हे साहित्य संमेलन घ्यावयाचे आहे, हे स्पष्ट करण्यात आले. करोनाची परिस्थिती लक्षात घेऊन त्याचा प्रभाव कमी झाल्यानंतर संमेलन घ्यायचे. संमेलनाच्या तारखा आत्ताच निश्चित करता येणार नाहीत. मात्र, फार पुढे जाणार नाहीत, याची दक्षता स्वागत मंडळ आणि लोकहितवादी मंडळ घेईल. त्या संदर्भात स्वागताध्यक्ष तथा राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करून संमेलन घेण्याचा प्रयत्न करण्याविषयी मंगळवारच्या बैठकीत चर्चा झाल्याचेही ठाले पाटील आणि जातेगावकर यांनी काढलेल्या पत्रकाद्वारे कळवले आहे. त्यामध्ये संमेलन ऑनलाइन घेणे स्वागतमंडळाच्या विचाराधीन नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

संमेलन नाशिककरांसाठी घ्यावयाचे असल्याने त्याचा लाभ साहित्य रसिकांना घेता येईल, अशी महामंडळाप्रमाणेच स्वागत मंडळाचीही भूमिका आहे. मात्र, संमेलन जेव्हा घेऊ तेव्हा ते उत्तमच घेऊ याचा पुनरुच्चार नाशिकच्या प्रतिनिधींनी केला आहे. साहित्य संमेलनात वाचकांना पुस्तक खरेदी व प्रकाशक, विक्रेत्यांना पुस्तक विक्रीचा लाभ घेता यावा, तसेच लेखक-वाचकांच्या गाठीभेटी व्हाव्यात, अशीही महामंडळाची व स्वागत मंडळाची निर्विवाद भूमिका आहे, असेही महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. औरंगाबादेतील बैठकीत स्वागत मंडळाचे प्रमुख कार्यवाह व लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, स्वागत मंडळाचे समिती प्रमुख विश्वास ठाकूर, स्वागत मंडळाचे कार्यवाह डॉ. शंकर बोऱ्हाडे, लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त दिलीप साळवेकर, संजय करंजकर, सुभाष पाटील, विनायक रानडे आदींनी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे या पदाधिकाऱ्यांशी करोना वातावरणाच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली.