९५ व्या साहित्य संमेलनाचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन, ज्ञानपीठ विजेते दामोदर मावजो प्रमुख पाहुणे

शफी पठाण, लोकसत्ता

(भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्य नगरी, उदगीर) : तीन राज्यांच्या सीमेवर नेमस्थपणे मायमराठीची पताका फडकवत ठेवणाऱ्या उदगीर नगरीत आज २२ एप्रिल रोजी ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होत आहे. छत्रपती शाहू महाराज सभागृहात व डॉ. ना.य. डोळे व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या हस्ते सकाळी १०. ३० वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

यावेळी संमेलनाध्यक्ष आणि प्रसिद्ध कथाकार भारत सासणे तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानपीठ विजेते कादंबरीकार दामोदर मावजो यांच्यासह देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उद्योग, खनिकर्म व मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई, उच्च शिक्षणमंत्री अमित देशमुख, प्रख्यात संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर व साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, पर्यटन व सार्वजनिक बांधकाम मंत्री व संमेलनाचे स्वागताध्यक्ष संजय बनसोडे, कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, कार्यवाह रामचंद्र तिरुके उपस्थित राहतील.

उद्घाटनापूर्वी सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी चौकातून ग्रंथिदडी निघेल. ग्रंथिदडीत ९५ पथक सहभागी होणार असून, महाराष्ट्राचे संत साहित्य, लोककला, उदगीरचे वैभव, सीमाभागातील संस्कृतीचा ‘संगम’ यात पाहायला मिळणार आहे. साहित्य नगरीत येणाऱ्या देशभरातील सारस्वत आणि साहित्य रसिकांच्या स्वागतासाठी अवघ्या शहरात स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. ग्रंथिदडीचा मार्ग रांगोळय़ांनी सजला आहे.

चला हवा येऊ द्याने हसवले

वातावरण निर्मिती करण्यासाठी संमेलनाच्या पूर्वसंध्येला ‘चला हवा येऊ द्या’ या मराठी विनोदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम बघायला उदगीरकरांनी तुफान गर्दी केली होती. आदल्या दिवशी अजय अतुल यांच्या सांगीतिक कार्यक्रमात प्रेक्षकांना प्रवेशपत्र देण्यात आले होते. मात्र प्रवेशपत्रांमुळे मोठा गोंधळ उडाल्याने ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमासाठी प्रवेशपत्राची अट आयोजकांनी मागे घेतली. या कार्यक्रमाने प्रेक्षकांना पोट धरून हसवले.

पाच परिसंवादांची वैचारिक मेजवानी

संमेनलाच्या पहिल्याच दिवशी श्रोत्यांना तब्बल पाच परिसंवादांची वैचारिक मेजवानी मिळणार आहे. छत्रपती शाहू महाराज सभागृह : डॉ. ना.य. डोळे व्यासपीठावर दुपारी २.३० ते ४.४० या वेळेत ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : काय कमावले, काय गमावले’ या विषयावर पहिला परिसंवाद होईल. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे, अन्वर राजन, सारंग दर्शने, अजय कुलकर्णी, राजेश करपे हे यात सहभाग घेतील. माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे अध्यक्षस्थानी असतील. लोकनेते विलासराव देशमुख सभागृह : हुतात्मा भाई श्यामलालजी व्यासपीठावर दुपारी २.३० ते ४.४० वेळेत ‘मराठी लेखिकांचे लेखन व्याज स्त्रीवादात अडकले आहे का?’ या विषयावरील दुसऱ्या परिसंवादात केशव तुपे, शुभदा चौकर, आशुतोष जावडेकर, नीरजा, रमेश शिंदे, स्वाती दामोदरे यांचा सहभाग असेल. डॉ. दिलीप धोंडगे अध्यक्षस्थानी असतील. छत्रपती शाहू महाराज सभागृह : डॉ. ना.य. डोळे व्यासपीठावर दुपारी ४ ते ६.३० वेळेत ‘मराठी साहित्यातील शेतकऱ्यांचे चित्रण : किती खरे, किती खोटे?’ विषयावरील तिसऱ्या परिसंवादात दिलीप बिरूदे, गिरीश जाखोटिया, अण्णा वैद्य, जयद्रथ जाधव, वि.दा. पिंगळे व म. ई. तंगावार सहभागी होणार असून, कुलगुरू डॉ. अशोक ढवण अध्यक्षस्थानी असतील. लोकनेते विलासराव देशमुख सभागृह : हुतात्मा भाई श्यामलालजी व्यासपीठावर दुपारी ४.३० ते ६.३० वेळेत ‘मराठी-कन्नड-तेलुगू आणि उर्दू यांचा भाषिक व सांस्कृतिक अनुबंध’ विषयावरील चौथ्या परिसंवादात चंद्रकांत भोंजाळ, मल्लिका, प्रा. डॉ. रवींद्र शोभणे, अस्लम मिर्झा, व्ही.एस. माळी, मोहिब कादरी यांचा सहभाग राहील. प्रकाश भातंब्रेकर अध्यक्षस्थान भूषवतील. नथमलशेठ इन्नानी सभागृह : धर्मवीर अ‍ॅड. संग्रामअप्पा शेटकार व्यासपीठावर दुपारी ४.३० ते ६.३० वेळेत ‘लेखक आणि लोकशाही मूल्ये!’ या विषयावरील पाचव्या परिसंवादात हेमांगी जोशी, दिलीप चव्हाण, सोनाली नवांगुळ, हलिमा कुरेशी, अतुल देऊळगावकर, राजकुमार तांगडे यांचा सहभाग राहील. याच व्यासपीठावर दुपारी २.३० ते ४.३० या वेळेत लोकनृत्याचे सादरीकरण करण्यात येईल. तर निमंत्रितांचे कविसंमेलन सायंकाळी ७ ते ११.३० या वेळेत होणार असून, विश्वास वसेकर अध्यक्षस्थानी असतील. भारत सातपुते संचालन करतील.