राज्याच्या वेगवेगळ्या भागात कार्यरत ९५ पोलीस निरीक्षकांना उपअधीक्षकपदी बढती देण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला. यात मराठवाडय़ातील ९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीचा विषय गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. गेल्या काही महिन्यांपासून अनेक पोलीस निरीक्षक पदोन्नतीची चातकाप्रमाणे वाट पाहत होते. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी पदोन्नतीचा प्रश्न निकाली निघेल, असे वाटत होते. परंतु आचारसंहिता लागल्याने पदोन्नतीचे आदेश अलीकडेच जारी करण्यात आले. नांदेडचे श्यामकांत तारे, दहशतवाद विरोधी पथकातील अनिल ठाकरे यांच्यासह पूर्वी नांदेडात कार्यरत असलेले राजेंद्र मोरे, वसंत कांबळे यांना पदोन्नती मिळाली.
निवृत्तीच्या उंबरठय़ावर असलेल्या प्रभारी उपअधीक्षक श्यामकांत तारे यांना नागपूरच्या प्रशिक्षण केंद्रात उपप्राचार्य म्हणून पदोन्नती देण्यात आली. अंबड पोलीस ठाण्यातील वसंत कांबळे यांची औरंगाबादला जातपडताळणी विभागात बदली, तर जालन्याचे गजानन जायभाय यांची जालन्यातच पोलीस प्रशिक्षण केंद्रात उपप्राचार्य म्हणून पदोन्नती करण्यात आली. औरंगाबाद शहरातील अर्जुन भांड यांची नगरला पोलीस मुख्यालयात, तर जालना येथील विष्णुपंत बेद्रे यांची नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे उपविभागीय अधिकारी म्हणून पदोन्नती झाली. औरंगाबाद ग्रामीणमधील आनंद पाटील यांना सांगली येथील मुख्यालयात पोलीस उपअधीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली.
मराठवाडय़ातून ९ अधिकारी अन्य विभागात जात असताना या विभागात मात्र एकाही अधिकाऱ्याची नियुक्ती देण्यात आली नाही. वसंत कांबळे, गजानन जायभाय, अर्जुन भांड व विष्णुपंत बेद्रे यांना पदोन्नती देताना गृह विभागाने मराठवाडा विभागाबाहेर पाठविले नाही. पुणे शहरात कार्यरत राजेंद्र मोरे यांची दौंडला उपविभागीय अधिकारी म्हणून, तर िहगोलीचे विकास तोटावार यांची ठाणे शहरात सहायक आयुक्त म्हणून पदोन्नती झाली. पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करून पदोन्नतीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सहायक निरीक्षकांच्या पदोन्नतीचा आदेशही लवकरच जारी होईल, असे सांगण्यात आले.