scorecardresearch

प्रवेशद्वारांना नाव थोरामोठय़ांचे की प्रायोजकांचे? वर्धा साहित्य संमेलनाच्या आयोजकांपुढे पेच

शहरातील ३१ स्वागत कमानींची जबाबदारी स्वयंसेवी संस्थांकडे सोपवण्याचे निश्चित झाले आहे.

प्रवेशद्वारांना नाव थोरामोठय़ांचे की प्रायोजकांचे? वर्धा साहित्य संमेलनाच्या आयोजकांपुढे पेच
९६ वे मराठी साहित्य संमेलन ३, ४ व ५ फेब्रुवारीला वर्धेत होत आहे.

प्रशांत देशमुख, लोकसत्ता

वर्धा : साहित्य संमेलनस्थळातील प्रवेशद्वारांसाठी प्रायोजक शोधून पैसा उभा करायचा की थोरामोठय़ांची नावे देऊन पावित्र्य जपायचे, असा नवा पेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांपुढे उभा ठाकला आहे. सात प्रवेशद्वारांच्या माध्यमातून किमान एक कोटी रुपये गोळा होऊ शकतात. यातून संमेलनाच्या खर्चाला मोठा हातभार लागू शकतो, असा युक्तिवाद केला जात आहे.

९६ वे मराठी साहित्य संमेलन ३, ४ व ५ फेब्रुवारीला वर्धेत होत आहे. त्याची पूर्वतयारी जोरात सुरू आहे. संमेलनस्थळी सात प्रवेशद्वार तयार करण्याचे निश्चित झाले आहे. या प्रवेशद्वारांना मान्यवर साहित्यिकांची नावे देऊन त्यांचे यथोचित स्मरण करण्याचा विचार आयोजकांपैकी काहींनी मांडला तर काहींनी या प्रवेशद्वारांसाठी प्रायोजक शोधण्याचे मत व्यक्त केले. मुख्य मंडप सात ते साडेसात हजार आसनक्षमतेचा असेल. उपमंडप सातशे आसन क्षमतेचा असून त्यात विविध उपक्रम होतील. पाचशे ते सातशे आसनक्षमतेचे अन्य पाच मंडप राहतील. पुस्तक प्रदर्शनासाठी सर्वात मोठा भाग राखून ठेवण्यात आला आहे. सर्वसामान्य साहित्य प्रतिनिधींच्या जेवणाची व्यवस्था सव्वा चार लाख वर्गफुटात तर महत्त्वाच्या व्यक्तींच्या जेवणाचा मंडप चाळीस हजार वर्गफुटात असेल. व्ही.आय.पी. वाहनतळ दीड लाख वर्गफुटात तर इतर निमंत्रितांसाठीचे वाहनतळ तीन लाख वर्गफुटात करण्याचे ठरले आहे. शहरातील ३१ स्वागत कमानींची जबाबदारी स्वयंसेवी संस्थांकडे सोपवण्याचे निश्चित झाले आहे.

निर्णय लवकरच!

थोरामोठय़ांचे स्मरण की प्रायोजक यावर येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. वर्धेचे सुपुत्र असलेले वऱ्हाडी कवी देविदास सोटे यांचे नाव राहणारच आहे. अशा स्थितीत पैसा दुय्यम ठरतो, असे संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रदीप दाते यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-12-2022 at 05:54 IST

संबंधित बातम्या