शिवसेनेतेल्या ९९ टक्के शिवसैनिकांना खासदार संजय राऊत खटकतात. त्यामुळेच शिवसेनेचे लोकसभेचे खासदार संजय राऊत यांना किंमत देत नाहीत आणि नेताही मानत नाहीत. संधी मिळेल तेव्हा संजय राऊत यांना फाट्यावर मारतात अशी बोचरी टीका भाजपाचे नेते निलेश राणे यांनी केली आहे. आपल्या ट्विटमधून निलेश राणे यांनी संजय राऊत आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

ट्विटमध्ये नेमकं काय म्हणालेत निलेश राणे?
“आधी CAA नंतर कृषी बिल, दोन्ही वेळेला लोकसभेत समर्थन राज्यसभेत विरोध याचं कारण, शिवसेनेचे लोकसभेचे खासदार संज्या राऊतला किंमत देत नाही व नेता मानत नाही. संज्या ९९% शिवसैनिकांना खटकतो म्हणून संधी मिळेल तेव्हा ते संज्याला फाट्यावर मारतात आणि पक्ष भूमिका राहते बाजूला. नाणार प्रकल्प व एमायडिसी राजापूर या दोन्ही प्रकल्पांच्या जमीन घोटाळा प्रकरणी उद्या पत्रकार परिषद घेणार आहे. जमिन व्यवहारात मोठा भ्रष्टाचार कोण करतय रत्नागिरी जिल्ह्यात हे नावासकट उद्या बाहेर काढणार ”

आणखी वाचा- कृषी विधेयकांवरुन राज्यसभेत झालेल्या गोंधळावर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

नितेश राणे यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख त्यांच्या ट्विटमध्ये केला आहे. एवढंच नाही तर आधी CAA आणि नंतर कृषि विधेयकांना शिवसेनेने लोकसभेत पाठिंबा दिला आणि राज्यसभेत विरोध केला याचं कारण काय? त्याचं कारण संजय राऊत आहेत. कारण ९९ टक्के शिवसैनिक हे संजय राऊत यांना किंमत देत नाहीत. तसंच नेताही मानत नाहीत असं उत्तरही निलेश राणे यांनी दिलं आहे.

आणखी वाचा- शिवसेना हा अत्यंत कनफ्युज पक्ष- देवेंद्र फडणवीस

सोमवारी नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेना हा कनफ्युज पक्ष असल्याची टीका केली होती. शिवसेनेचं शेतकऱ्यांबाबत निश्चित असं काही धोरण नाही. त्यांनी आधी ते ठरवावं तोपर्यंत निव्वळ शेतकरी प्रश्नावरुन राजकारण करु नये असा खोचक सल्ला त्यांनी दिला होता. त्यांच्या पाठोपाठ आज निलेश राणे यांनीही शिवसेनेवर टीका केली आहे.