बार्शी तालुक्यातील चिखर्डे गावात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक अर्थसंकल्पातून बंधनकारक असलेला दिव्यांग कल्याण निधी उपलब्ध होत नाही दिव्यांग मुलांच्या पालकांसह गावकरी तीन महिन्यांपासून चक्री उपोषण करीत होते. या उपोषणात दिव्यांग बहिणीपाठोपाठ भावाचाही मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. मात्र, प्रशासनाकडून या कुटुंबाला न्याय मिळण्याऐवजी पोलिसांनी उलट मृत दिव्यांग मुलांच्या पालकांसह गावक-यांवर दंगा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे प्रशासनाने याप्रकरणात अन्यायच करीत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
हेही वाचा- “नागपूर-हैदराबादला जोडणारी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू करा”, मुनगंटीवारांची केंद्र सरकारकडे मागणी
चिखर्डे गावात राहणारे रामचंद्र दत्ता कुरूळे (वय ४०) यांची दोन्ही अपत्ये दिव्यांग आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वार्षिक अर्थसंकल्पात पाच टक्के निधी दिव्यांग कल्याणासाठी तरतूद करणे बंधनकारक अहे. परंतु चिखर्डे ग्रामपंचायतीकडून दिव्यांग कल्याण निधीची तरतूद होत नाही, दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही म्हणून रामचंद्र कुरूळे दाम्पत्याने आपल्या दिव्यांग अपत्यांसह गावात ग्रामपंचायतीसमोर चक्री उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली नव्हती. दरम्यान, तीन महिन्यापूरूवी या आंदीलनदरम्यान कुरूळे यांची मुलगी वैष्णवी (वय १३) हिचा मृत्यू झाला. परंतु तरीही प्रशासनाकडून योग्य न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने हालचाली झाल्या नाहीत. तेव्हा पुन्हा कुरूळे दाम्पत्यासह गावक-यांनी गावातील स्मशानभूमीत बसून पुन्हा चक्री उपोषण सुरू केले असता कुरूळे यांचा दुसरा दिव्यांग मुलगा संभव (वय १०) याचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे पुन्हा खळबळ होऊन प्रशासन जागे झाले. कुरूळे दाम्पत्याने जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मृत मुलावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीत प्रहार संघटनेच्या संजीवनी बारंगुळे यांनी गावात पोलीस अधिकाऱ्यांसमोर स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. त्याचवेळी आंदोलक गावक-यांनी संताप व्यक्त करीत गोंधळ घातला. प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला.
तथापि, याप्रकरणी कुरूळे कुटुंबीयांना न्याय मिळण्याचे आश्वासन मिळाले असताना दुसरीकडे रामचंद्र कुरूळे यांच्यासह अमर बाबासाहेब पाटील, ज्ञानदेव पांडुरंग बळी, नंदकुमार अशोक गिरामकर (रा. चिखर्डे), संजीवनी बारंगुळे, बाळू खपाले, बालाजी डोईजोडे (रा. बार्शी) आणि इतरांविरूध्द पांगरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी दंगा करणे, आत्मदहनाचा प्रयत्न करणे, पोलिसांच्या आदेशाचे पालन न करणे आदी आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, न्यायहक्कासाठी आंदोलनात सहभागी झालेल्या कुरूळे कुटुंबीयांची दोन्ही दिव्यांग मुलांच्या मृत्यूनंतरही तात्काळ न्याय मिळणे अपेक्षित होते. परंतु उलट कुरूळे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल झाल्याने प्रहार संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे.