सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थान मध्ये ऐन गणपती उत्सवात उत्तराधिकारी पदावरून वाद उफाळून आला आहे. अभिनेत्री आणि राजकन्या भाग्यश्री पटवर्धन-दासानी यांनी श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांनी उत्तराधिकारी म्हणून नेमलेल्या दत्तक पुत्र राजकुमार आदित्य राजे यांना डावलत गणपती मंदिरात आरती केली. त्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. दुसरीकडे आदित्यराजे हेच उत्तराधिकारी सांगत भाग्यश्री यांना आरती करण्याचा अधिकार नसल्याचं विजयसिंह राजे पटवर्धन यांनी म्हटलं आहे. काय आहे हा वाद आपण जाणून घेऊ.

गणेश चतुर्थीच्या दिवशी नेमकं काय घडलं?

सांगलीतल्या श्री गणपती पंचायतन संस्थान या ठिकाणी गणपतीच्या उत्सव मूर्तीची आरती अभिनेत्री भाग्यश्रीने केली आहे. या संस्थानचे युवराज हे आदित्यराजे पटवर्धन असताना भाग्यश्री पटवर्धन यांनी आरती केल्याने संस्थानचे मॅनेजर आणि भाग्यश्री यांच्यात वाद झाला आहे. तसंच या प्रकरणी पटवर्धन संस्थानचे राजे आणि भाग्यश्री यांच्यातले मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून आदित्यराजे पटवर्धन यांची निवड केली आहे. तरीही उत्सव मूर्तीच्या आरतीचा मान घेत भाग्यश्री पटवर्धन यांनी आरती केली. भाग्यश्री पटवर्धन या विजयसिंह राजे पटवर्धन यांच्या कन्या आहेत. तरीही गणेश चतुर्थीच्या दिवशीच वडील आणि मुलीमध्ये वाद उफाळून आल्याचं समोर आलं आहे.

भाग्यश्री पटवर्धन यांचं म्हणणं काय?

मी अनेक वर्षांनी आले आहे, पण गणपतीचा विसर पडलेला नाही. श्रीगणेश मंदिर जे आहे त्या गणपतीचा आदर तुम्हा सगळ्यांच्या पाठिशी असूदेत. गणपती बाप्पा आपल्या मनात आहे. सांगलीकरांचा रक्षक आहे. आपल्याला बाप्पा सांभाळून घेईल ही आस्था आहे. इतकंच उत्तर भाग्यश्री पटवर्धन यांनी दिलं आहे. आरतीच्या प्रश्नावर त्यांनी बोलणं टाळलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांना याबाबत प्रश्न विचारला गेला होता.

विजयसिंह राजे पटवर्धन काय म्हणाले?

“भाग्यश्री आणि तिचे पती हिमालय दासानी यांनी संस्थानात मोठा गैरकारभार केला होता, त्यामुळेच त्यांना संस्थानातून काढून टाकण्यात आले आहे भाग्यश्री यांना हे वाटत असेल की आम्ही मेल्यानंतर आता मीच वारस आहे. आम्ही जातीयवाद करत नाही. पण काही परंपरा आम्ही बाळगतो. मी माझ्या धर्माचा आदर करतो. गाभाऱ्यात आमच्या कुटुंबातले लोकच जाऊ शकतात. ती प्रथा तोडून इतरांना भाग्यश्री घेऊन गेल्या. मी कुणाला संमती दिलेली नाही. मी मुलगी आहे आणि मी काहीही करू शकते असं जर वाटत असेल तर चालणार. जी परंपरा आहे ती मोडीत काढली तर सांगलीकर चालवून घेणार नाहीत. वारस म्हणून आदित्यराजेंची निवड केली आहे ते त्यांनी मान्य करावं. त्यांचीही जमीन हडपण्याचा प्रयत्न करू नये. आदित्यराजेंना सगळ्या सांगलीकरांना मान्यता द्यावी. इतर लोक विरोधात करत असतील तर त्याला खतपाणी घालू नये.” असं म्हणत भाग्यश्री यांचे वडील विजयसिंह पटवर्धन यांनी दिली आहे.

भाग्यश्री यांच्या आईने काय म्हटलं आहे?

आमचं नाव सांगून आणि आम्ही आता काही कारभार बघणार नाही असं सांगू कुणी पैसे उकळण्याचा प्रय़त्न करत असेल तर ते करू नये. आमच्या विरोधात सांगलीकरांनी भूमिका घेत त्यांच्या बाजूला जावं असं आम्हाला वाटत नाही. गणेश मंदिर हे सांगलीचं वैभव आहे. आमच्या विरोधात जाण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं. जनतेने आम्हाला पाठिंबा द्यावा हीच आमची विनंती आहे. अशी प्रतिक्रिया भाग्यश्री यांच्या आई राजलक्ष्मी राजे पटवर्धन यांनी दिली आहे.