scorecardresearch

सोलापूर : मुलीला घटस्फोट दिल्याने हवालदार सासऱ्याने केला जावयाचा खून

नितीन अनिल पतंगराव (वय २७, रा. हुच्चेश्वरनगर, कुमठा नाका, सोलापूर) असे खून झालेल्या जावयाचे नाव आहे.

Wife Killed Husband in Dhule
जाणून घ्या नेमकी काय घडली घटना? (प्रातिनिधिक छायाचित्र)

मुलीला घटस्फोट देण्याच्या कारणावरून पोलीस हवालदार असलेल्या सासरा व मेव्हण्यासह सात-आठजणांनी मिळून सशस्त्र हल्ला करून जावयाचा खून केल्याची घटना सोलापुरात घडली. याप्रकरणी सासऱ्यासह तिघाजणांना पोलिसांनी अटक केली आहे.

नितीन अनिल पतंगराव (वय २७, रा. हुच्चेश्वरनगर, कुमठा नाका, सोलापूर) असे खून झालेल्या जावयाचे नाव आहे. त्याचा पोलीस हवालदार सासरा महेश शिवाजी शेजेराव (वय ५२), त्याचा मुलगा हर्षवर्धन शेजेराव (वय १८, रा. वैष्णवी प्लाझा, कल्याणनगर, सोलापूर) आणि त्यांचा नातेवाईक श्रीकांत गुरूलिंग कोळी (वय ३२, रा. शिवरत्न नगर, जुळे सोलापूर) या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. रात्री नितीन पतंगराव याच्या घराजवळ खून करण्यात आला.

मृत नितीन याचा विवाह हवालदार शेजाराव याच्या मुलीबरोबर झाला होता. परंतु, दोघात पटत नव्हते. त्यामुळे पत्नी सासरी न नांदता माहेरी राहात होती. याच कारणामुळे पतंगराव व शेजेराव कुटुंबीयांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद उफाळून आला होता. यातच जावई नितीन व त्याचा मित्र प्रदीप पाटील यांना केलेल्या मारहाणीबद्दल हवालदार शेजेरावविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, वाद विकोपाला गेल्यानंतर जावई नितीन याने न्यायालयात पत्नीला घटस्फोट देण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे चिडलेला सासरा शेजेराव व त्याच्या मुलाने नितीन यास जीवे ठार मारण्याची धमकीही दिली होती.

हेही वाचा – “पुण्यातील पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील,” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, मलंग गडावर केली महाआरती

हेही वाचा – नाशिक : धर्मांतराच्या प्रलोभनाने महिलेवर अत्याचार, चार संशयितांना पोलीस कोठडी

या पार्श्वभूमीवर काल रात्री नितीन पतंगराव यास शेजेराव पितापुत्रासह श्रीकांत कोळी व अन्य चार-पाचजणांनी गाठले आणि लोखंडी रॉड, काठ्यांनी त्याच्यावर सशस्त्र हल्ला केला. यात डोक्यावर गंभीर प्रहारामुळे रक्तस्त्राव होऊन नितीन याचा मृत्यू झाल्याचे त्याचा भाऊ सचिन पतंगराव याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 19:16 IST