करोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर  ताडोबा व्यवस्थापनाने काही कडक निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार आता  मास्क शिवाय ताडोबात प्रवेश करणाऱ्या पर्यटकाला १ हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ताडोबात सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजनाच पालन करून पर्यटन सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटनाचे करोनासंदर्भातील नियम आता अधिक कटाक्षाने पाळले जाणार असून, जिप्सीच्या वेळा विभागून पर्यटकांची गर्दी टाळण्याचा प्रयत्न होणार आहे. प्रचलित वेळेच्या अर्धा तास आधीच पर्यटकांना प्रवेश दिला जाणार असून, अर्धा तास आधी परतावे लागणार आहे. विदर्भात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. अशावेळी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात एकाचवेळी आणि एकाच ठिकाणी पर्यटकांची जास्त गर्दी होवू नये याकरिता तातडीने उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी घेतला आहे.

ज्या सफारी वाहनात सहा पर्यटक असतील, अशा वाहनांना ठराविक वेळेच्या अर्धा तास आधीही ताडोबात पर्यटनासाठी प्रवेश करता येणार आहे. पर्यायाने त्यांना अर्धा तास आधी परतही यावे लागेल. यामुळे गर्दी होणार नाही. तसेच विना मास्क कुणालाही प्रवेश दिला जाणार नसून, सर्व पर्यटकांचे थर्मल स्कॅनिंग प्रवेशद्वारावरच करण्यात येईल. सफारीचे जिप्सी वाहन निर्जंतूक करणे बंधनकारक राहील. सफारी दरम्यानही एकाच ठिकाणी वाहनांची गर्दी करणार्‍या जिप्सीचालक तसेच पर्यटकांवर नियमानुसार कारवाई केली जाईल. या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील. या सुचनांचे उल्लंघन ही गंभीर बाब समजून नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही डॉ. रामगावकर यांनी दिला आहे.या सूचना रविवार, १४ मार्चपासूनच लागू होणार आहेत. गर्दी टाळण्यासाठी जे-जे करता येते, ते सर्व करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे मत डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी मध्यामांशी बोलताना व्यक्त केले.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटन १ ऑक्टोबर २०२० पासून नियमानुसार सुरू करण्यात आले होते. कोवीड-19 या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हे पर्यटन सुरू करताना केंद्र शासन, राज्य शासन, स्थानिक प्रशासन तसेच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने सुचविल्यानुसार खबरदारी घेवून निसर्ग पर्यटन राबविण्यात येत आहे. तसेच करोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे वनकर्मचारी, मार्गदर्शक व जिप्सी चालकांना करोनाची लागण होवू नये याकरिताही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.