अलिबाग- रायगड जिल्हा परिषद आणि १५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक होत आहे. निवडणुकीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात सध्या मोठ्या प्रमाणात खाजगी गाड्या वापरण्यात येत असल्याची बाब मसोर आली आहे. टॅक्सी परवाना धारक वाहने वापरणे आवश्यक असतांना खाजगी वाहने निवडणूकीसाठी तैनात करण्यात आली आहेत.
जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी तर १५ पंचायत समित्यांच्या ११८ जागांसाठी निवडणुक होत आहे. जिल्हा परिषदेसाठी १७३ तर पंचायत समितीसाठी ३२९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ७ फेब्रुवारीला मतदान तर ९ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. निवडणुक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात वाहनांची आवश्यकता भासते आहे. यासाठी भाडेतत्वावर वाहने अधिग्रहीत करण्यात आली आहेत. पण यात अनेक खाजगी वाहनांचा समावेश आहे.
निवडणुक कामांसाठी वाहने अधिग्रहीत करतांना ती टॅक्सी परवाना धारक असणे अपेक्षित आहे. खाजगी वाहने शासकीय आणि निवडणूक कामासाठी वापरता येत नाहीत. तरीपण रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी खाजगी वाहने निवडणूक कामांसाठी वापरली जात असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे जिल्हाप्रशासनाकडूनच नियमांचे परिवहन विभागाच्या नियमांचे उल्लघन होत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
या बाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता, निवडणूकीसाठी लागणाऱ्या गाड्या पुरविण्यासाठी वेंडर (कंत्राटदार) नेमला जात असतो. या वेंडरकडून लागतील तशा गाड्या उपलब्ध करून द्यायच्या असतात. पण आयत्यावेळी टॅक्सी परवानाधारक उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे खाजगी वाहने उपलब्ध करून दिली जातात. त्यामुळे निवडणूक कामासाठी खाजगी वाहने वापरावी लागत आहेत. संबधित वेंडरला टॅक्सी परवना असलेल्या गाड्या देण्याची सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ. रविंद्र शेळके यांनी दिली आहे.

