सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. ३१ जानेवारी पर्यंत अहवाल देण्याचे आदेश सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी सोमवारी दिले.
हेही वाचा- एकनाथ शिंदेंना ठाण्याबाहेर कुणी ओळखत होतं का? – अरविंद सावंतांचा बोचरा प्रश्न
जिल्हा बँकेत इमारत नूतनीकरण, फर्निचर, एटीएम खरेदी, शाखा नूतनीकरण आदी अनावश्यक बाबींवर सुमारे ३० ते ४० कोटींचा खर्च करण्यात आला असल्याचा आक्षेप विद्यमान अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासह तत्कालिन ९ संचालकांनी सहकार विभागाकडे लेखी पत्राद्बारे घेतला होता. तसेच स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल फराटे यांनीही याबाबत तक्रार केली होती. यावर सहकार विभागाने चौकशी समिती नियुक्त केली होती. मात्र, चौकशी समिती नियुक्तीला २४ तास उलटण्यापूर्वीच तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली.
दरम्यान, शिंदे सरकारने ३१ डिसेंबर रोजी स्थगिती आदेश मागे घेत चौकशीचे आदेश दिले. यानुसार सहकार आयुक्त कवडे यांनी कोल्हापूरच्या सहनिबंधकांना चार सदस्यीस समिती नियुक्त करण्याचे आदेश आज दिले. या समितीमध्ये शिथल चोथे, संजय पाटील, अनिल पैलवान आणि रघुनाथ भोसले हे चार सदस्य असून या समितीने आक्षेपाबाबत मुद्दयांची चौकशी करून अहवाल पूरक कागदपत्रांसह व कार्यवाही सूचक मुद्दयासह 31 जानेवारीपर्यंत सादर करावा असे आदेश विभागीय सहनिबंधकांना आज दिले.