घरात आईवडिलांच्या नेहमी होणाऱ्या भांडणाला कंटाळून मोठ्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर बहिणीला फासावर लटकलेले बघून लहाण बहिणीनेही ‘ताई मी तुझ्याशिवाय कशी जगू…मलाही तुझ्यासोबत यायचे आहे…’ अशी सुसाईड नोट लिहून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रकार लक्षात येताच तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ती जीवन-मृत्यूशी संघर्ष करीत आहे. ही खळबळजनक घटना गोरेवाडा परिसरात उघडकीस आली. साक्षी अमरितलाल तिवारी (१६, रा. माधवनगर) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. तर साक्षी तिवारी (१५) अशी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरितलाल तिवारी हे आरकेएम कंपनीशी जुळलेले असून ते रेल्वेस्थानकावर काम करतात. त्यांच्या कुटुंबात पत्नी, मुली साक्षी, शिवांगी व मुलगा अमित (११) आहेत. पत्नीच्या माहेरी असलेल्या मालमत्तेवरून अमरितलाल हा पत्नीशी नेहमी भांडण करीत होता. त्याला दारूचे व्यसन आहे. दारू पिऊन माहेरून पैसे आणि संपत्तीतील वाटा मागण्यावरून पती-पत्नीत वारंवार खटके उडायचे. त्यामुळे घरातील वातावरण दुषित झाले होते.

अकरावीत असलेली साक्षी आणि नववीत असलेली शिवांगी या दोघीही वडिलांच्या स्वभावाला कंटाळल्या होत्या. त्यामुळे त्यांनी अनेकदा आत्महत्या करण्याचा विचार केला. दोघींनी एकमेकींना समजावून घेत दिवस काढणे सुरू केले. दोन दिवसांपासून आई-वडिलांमध्ये कडाक्याचे भांडण सुरू असल्याने साक्षीने एकटीनेच आत्महत्येचा निर्णय घेतला. साक्षीने रविवारी सकाळी ११ वाजता बेडरूममध्ये ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आंघोळीला गेलेली शिवांगी बाहेर येतात तिला बहिण लटकलेली दिसली. त्यामुळे तिने लगेच वही-पेन घेतला. त्यावर आई-वडिलांच्या भांडणामुळे कंटाळल्याचे लिहिले. तसेच ताई मी सुद्धा तुझ्यासोबत येत आहे.. तुझ्यावर माझे खूप प्रेम आहे, असे लिहून घरातील फिनाईल प्राशन केले.

मानकापूर पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठले आणि शिवांगीला रुग्णालयात दाखल केले तर साक्षीचा मृतदेह मेयो रुग्णालयात रवाना केला. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.