मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या तत्काळ मान्य कराव्या यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ४३ रक्ताची निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते रमेश केरे पाटील यांनी औरंगाबाद येथे दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजपासून दोन दिवस औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत त्यावेळी ही निवेदने देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच सरकार ओबीसी आरक्षणाबाबत जी भूमिका घेता तीच भूमिका मराठा आरक्षणासाठी का घेत नाही? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रक्ताने लिहिलेली पत्र दर्शवली.

तोपर्यंत चारही पक्षाच्या विरोधात आमचे आंदोलन सुरूच राहणार –

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या संभाजीनर(औरंगाबाद) येथे येत आहेत. मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण, ते देखील ओबीसीमधून आणि ज्या मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या आहेत, त्या सगळ्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून रक्ताने लिहिलेली ४३ पत्र आम्ही देणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर जर आमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं तर ठीक आहे. ज्या पद्धतीने ओबीसी बांधवाचं राजकीय आरक्षण दिल्यानंतर सगळे पक्ष बोलायला लागले, की जोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही निवडणूक होऊ देणार नाही. त्याच पद्धतीने चारही प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी भूमिका मांडायला पाहिजे. जोपर्यंत मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण ते देखील ओबीसीमधुन आणि प्रलंबित मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणूक होऊ देणार नाही. असं हे नेते जोपर्यंत बोलणार नाही, तोपर्यंत मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने या चारही पक्षाच्या विरोधात आंदोलन सुरूच राहणार.” असं मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं.