scorecardresearch

पोलिसांत फिर्याद दिल्याच्या रागापोटी बलात्कारित अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला

एका अल्पवयीन मुलीवर दोघा नराधमांनी मिळून सामूहिक बलात्कार तर केला. बार्शी तालुक्यातील बळेवाडी येथे हा संतापजनक प्रकार घडला.

child raped
प्रतिनिधिक छायाचित्र/लोकसत्ता

सोलापूर : एका अल्पवयीन मुलीवर दोघा नराधमांनी मिळून सामूहिक बलात्कार तर केलाच, परंतु त्याबद्दल पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर दोघा नराधमांनी पीडित मुलीवर सत्तूर व कोयत्याने प्राणघातक हल्लासुध्दा केला. बार्शी तालुक्यातील बळेवाडी येथे हा संतापजनक प्रकार घडला. यासंदर्भात पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अक्षय विनायक माने (वय २३) आणि नामदेव सिध्देश्वर दळवी (वय २४) यांच्या विरोधात गुन्हा दाखल  केला आहे.

अक्षय व नामदेव या दोघांनी गरीब कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरीने सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेऊन फिर्याद नोंदविली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून दोन्ही आरोपींचा शोध घ्यायला सुरूवात करताच, या दोघा आरोपींनी  रात्री पुन्हा पीडित तरूणीच्या घरी जाऊन, आमच्या विरोधात बलात्काराची फिर्याद दाखल करतेस काय, असा जाब विचारला. आता तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत दोघा आरोपींनी सत्तूर व कोयत्याने पीडित मुलीवर सपासप वार करून प्राणघातक हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-03-2023 at 19:25 IST