गेल्या काही वर्षात अतिवृष्टी आणि हवामानातील होणाऱ्या बदलांचा गेल्या काही वर्षात कोकणातील भात शेतीला सातत्याने फटका बसत होता. त्यामुळे अतवृष्टी आणि हवामानातील बदलांचा सामना करु शकेल अशा संकरीत भात वाणाची गरज निर्माण झाली होती. ही गरज आता भाभा अणु संशोधन केंद्र आणि कर्जत येथील भात संशोधन केंद्रच्या नव्या वाणामुळे भरून निघणार आहे.

हवामानात सतत होणारे बदल, पावसातील अनियमितता, अतिवृष्टी आणि लांबणारा पाऊस यामुळे कोकणातील भात पिक निसर्गाच्या दृष्टचक्रात अडकले आहे. ज्यामळे शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. आधीच शेतीसाठी कामगारांची कमतरता, यांत्रिकीकरण आणि सिंचन सुविधांचा अभाव यामुळे कोकणातील भात शेती समोरील आव्हाने वाढली आहेत. यात आता हवामानाच्या मनमानी कारभाराचाही फटका बसू लागला आहे. पारंपारीक बियाणे हवामानातील सततच्या बदलांना सामोरे जाण्यात असमर्थ ठरत असल्याने, सुधारित आणि संकरीत अशा बियाण्यांची गरज निर्माण झाली होती. हवामानातील बदलांचा समर्थपणे सामना करू शकेल अशा बियाणे निर्माण करण्याची आवश्यकता होती. हीबाब लक्षात घेऊन गेली तीन ते चार वर्ष संशोधन सुरू होते.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत आणि भाभा अणू संशोधन केंद्र यांच्या माध्यमातून हे संशोधन सुरू होते. ज्यातून अतिवृष्टी आणि पाणथळ जागेत तग धरु शकेल असे वाण विकसित झाले आहे. ज्याला ट्रॉम्बे कोकण महान असे नाव देण्यात आले आहे. महत्वाची बाब म्हणजे हे भात वाण लागवडीसाठी प्रसारित करण्यास, राज्यस्तरीय वाण निवड समितीने मंजूरी दिली आहे. त्यामुळे या वाणाच्या आगामी खरीप हंगामापासून या वाणाच्या व्यवसायिक उत्पादनाला सुरुवात होणार आहे.

अतीवृष्टीतही तग धरु शकेल अशा संकरीत वाणाची निर्मिती व्हावी हा या मागचा उद्देश होता. संशोधनानंतर हे वाण विकसित करण्यात आले आहे. ट्रॉम्बे कोकण महान ही गरवी भात जात असून तिचा कालावधी १४० ते १४५ दिवसांचा आहे. दाण्याचा प्रकार लांबट बारीक असून उंची मध्यम म्हणजे १०५ ते ११० सेंटीमीटर आहे. तर या संकरीत वाणाची उत्पादन क्षमता सरासरी ५० ते ५५ क्विंटल प्रती हेक्टर आहे. योग्य व्यवस्थापन केल्यास १०० क्विंटल प्रती हेक्टर उत्पादन मिळू शकेल, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. पुसा बासमती आणि रत्नागिरी-२४ या दोन वाणांच्या संकरातून ही जात तयार केली आहे. या वाणाच्या भरडाई चे प्रमाण ६९.५५ टक्के असून अखंड तांदळाचे प्रमाण ६१.२५ टक्के आहे.तांदूळ चकचकीत असून पिटुळपणा नसल्याने तांदळाची गुणवत्ता उत्तम आहे.अमायलोजचे प्रमाण २४.८ टक्के म्हणजे मध्यम आहे. महत्वाची बाब म्हणते हा तांदूळ शिजवल्यानंतर भात मोकळा होतो, चिकट होत नाही.

या जातीची शिफारस संयुक्त संशोधन समिती ( जॉइन्ट अग्रेस्को )ने आधीच केली आहे. आता राज्यस्तर समितीने यास मंजूरी दिली असल्याने, राष्ट्रीय स्तरावर अधिसूचनेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यामुळे सदर जात कोकण, प.महाराष्ट्र, विदर्भ अशा महाराष्ट्रातील सर्व भागात लागवडीसाठी प्रसारित करण्यात येणार आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय भावे यांच्या मार्गदर्शनाखाली भात विशेषज्ञ डॉ.भरत वाघमोडे, वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. रमेश कुणकेरकर,सहा.भात पैदासकार डॉ.महेंद्र गवई, वनस्पती शरीरक्रियाशास्त्रज्ञ डॉ. मीनाक्षी केळुस्कर, सहा.भात विशेषज्ञ डॉ. प्रवीण वणवे, भाभा अणू संशोधन केंद्र, ट्रॉम्बेचे शास्त्रज्ञ डॉ. बी. के. दास व डॉ. विकासकुमार यांचा ही जात विकसित करण्यात समावेश आहे.

वाढते शहरीकरण, औद्योगिकरण, मजुरांची कमतरता, यांत्रिकीकरणाचा अभाव या सारख्या आव्हानामुळे कोकणातील शेतीक्षेत्रात मोठी घट होत आहे. शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरवण्यास सुरूवात केली आहे. अशात आता हवामानातील बदल आणि अतिवृष्टीचे संकट उभे राहीले आहे. यातून कोकणातील शेतकरी तग धरू शकेल का असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा झाला आहे. अशा वेळी कोकण ट्रोम्बे हे भात वाण शेतकऱ्यासाठी वरदान ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

येत्या खरीप हंगामात मर्यादीत स्वरुपात हे वाण उपलब्ध होईल, पुढील वर्षापासून मुबलक बियाणे उपलब्ध होण्यास सुरुवात होईल. राज्यातील २० टक्के पाणथळ जमिनीसाठी हे उत्कृष्ट वाण उपलब्ध असेल. – डॉ. रवींद्र मर्दाने, कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ.