सोलापूर : सोलापूरच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात एका वृद्ध पुरुष रुग्णावर कठीण आणि दुर्मीळ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या झाल्याची माहिती डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली.
एका ६१ वर्षांच्या पुरुष रुग्णाच्या शरीरामध्ये अधिवृक्क ग्रंथीची गाठ तयार झाली होती. या ग्रंथींना सुप्रारेनल ग्रंथी म्हटले जाते. ग्रंथींची वाढलेल्या गाठीचा (ॲंड्रेनल ग्लैंड ट्युमर) आजार वैद्यकीय क्षेत्रात दुर्मीळ मानला जातो. असा आजार दहा लाख व्यक्तींपैकी दोन ते आठ व्यक्तींना होतो. शरीरातील दोन्ही मूत्रपिंडांच्या वरच्या बाजूला असलेल्या लहान, त्रिकोणी आकाराच्या अधिवृक्क ग्रंथी संप्रेरके तयार करतात. यातून शरीराचे चयापचय, व रोगप्रतिकारक शक्ती, रक्तदाब, तणावाला प्रतिसाद आणि इतर आवश्यक कार्ये नियंत्रित करण्यास मदत करतात. परंतु अधिवृक्क ग्रंथीची गाठ (ॲंड्रेनल ग्लैंड ट्युमर) हा आजार दुर्मीळ मानला जातो. या ग्रंथीतून विविध संप्रेरके स्त्रवली जातात. यामुळे रुग्णाचा रक्तदाब वाढतो डोके दुखणे, चक्कर करणे, मळमळ होणे, छातीत धडधड करणे अशी लक्षणे दिसून येतात. याशिवाय पोटदुखी आणि अशक्तपणा येतो. यावर शस्त्रक्रिया करणे आव्हानात्मक असते. विशेषतः अत्याधुनिक दुर्बिणीद्वारे या शस्त्रक्रिया करणे जास्त कठीण मानले जाते.
हेही वाचा – सातारा : डी. पी. जैन कंपनीस ३८ कोटी ६० लाखांचा दंड
छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्यासह डॉ. संचित खरे, डॉ. अमेय ठाकूर, डॉ. अलिशा माथूर यांच्या पथकाने संबंधित रुग्णावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया केली. डॉ. नीलांबरी अडके, डॉ. मंजिरी देशपांडे व डॉ. सागर गुंडे या भूलतज्ज्ञांनी आपली जबाबदारी सांभाळली. रुग्णाची प्रकृती उत्तम असून त्याचा त्रास कमी झाल्याचा दावा अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी केला आहे.