सातारा: पंढरपूरहून साताऱ्याकडे प्लायवूड घेऊन निघालेला टेम्पो आगीत जळून खाक झाला. गोंदवलेनजीक पिंगळी घाटात मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. टेम्पोचालक वैभव युवराज ननावरे ( भंडीशेगाव, पंढरपूर) याने प्रसंगावधान राखून उडी मारल्याने तो बचावला. टेम्पो मात्र जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले.
याबाबत घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या दिंड्यांचा मुक्काम असलेल्या पिंगळी खुर्द गावाजवळच घाटात रात्री टेम्पोने पेट घेतल्याने खळबळ उडाली. सातारा-लातूर रस्त्यावरील पिंगळी घाटात घडलेल्या या घटनेमुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. टेम्पोला लागलेल्या आगीने प्लायवूडनेही पेट घेतला होता. तसेच वाहनाचे टायर फुटल्याने झालेल्या मोठ्या आवाजाने घबराट पसरली होती.
या घटनेची माहिती समजताच दहिवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी तत्काळ वडूज नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाला पाचारण केले. अनेकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अग्निशामक यंत्रणेला मदत करत आग आटोक्यात आणली. यावेळी घाबरलेला चालक वैभव युवराज ननावरे यांना शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी रुग्णवाहिका बोलावून तत्काळ रुग्णालयात हलवले.
यावेळी पिंगळी खुर्दचे पोलीस पाटील महेश शिंदे यांच्यासह गोंदवले बुद्रूक व पिंगळी ग्रामस्थांनी मदतकार्य केले. टेम्पो नेमका कशाने पेटला याचे कारण समजू शकले नाही. टेम्पो व आतील प्लायवूड पूर्ण जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.