दापोली: दापोली तालुक्यातील हर्णे बायपास रोड जवळील निसर्ग हॉटेल समोरील समुद्रकिनारी असलेल्या दगडात बुधवारी दुपारच्या सुमारास ५ ते ६ किलो वजनाचा व्हेल माशाच्या उलटीसारखा पदार्थ आढळून आला आहे.

दापोली पोलीस व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून ती व्हेल माशाचीच उलटी असल्याबाबत खातरजमा करण्यासाठी तो पदार्थ वनविभागाच्या नागपूर येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती वनाधिकारी यांनी दिली आहे.

हर्णे येथील सामाजिक कार्यकर्ते वाजीद खान यांनी हर्णे येथील निसर्ग हॉटेल समोरील समुद्र किनारी असलेल्या दगडात व्हेल माशाच्या उलटीसारखा पदार्थ दिसून आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी ही माहिती पत्राद्वारे वनविभागाला दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख, उपनिरीक्षक राजकुमार यादव, परीक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील व त्यांचे सहकारी दुपारी अडीजचे सुमारास हर्णे समुद्र किनाऱ्यावर पोचले.

त्यांना हा उलटी सदृश्य पदार्थ दगडात अडकलेल्या स्थितीत आढळून आला. त्याला मोठ्या प्रमाणात वाळू लागलेली होती. त्यामुळे तो पदार्थ धुवून पंचनामा करून वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हा पदार्थ व्हेल माशाची उलटी असल्याबाबत साशंकता व्यक्त केली असून त्याची खात्री करण्यासाठी तो पदार्थ तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती परीक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील यांनी दिली आहे.