बिबट्याच्या कातडयाची तस्करी करणार्‍या ठाण्यातील रहिवासी असलेल्या तरूणाला पोलीसांनी गुरूवारी रात्री मिरजेतील बस स्थानकावर अटक केली. असून त्याच्याकडून सव्वा पाच लाखाचे बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले आहे.

मिरजेत बिबट्याचे कातडे विक्री करण्यासाठी एक इसम येत असल्याची गोपनीय माहिती महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रविराज फडणीस यांना मिळाली होती. या माहितीनुसार फडणीस यांनी उप निरीक्षक राजू अन्नछत्रे, कुमार पाटील, बाळासाहेब निळे, अमोल ऐवळे आदींच्या पोलीस पथकासह वनक्षेत्रपाल युवराज पाटील व वनकर्मचारी यांनी पाळत ठेवली होती.

मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री दहा वाजणेच्या सुमारास एक इसम हातात पिशवी घेउन बसस्थानकामागे दिसला. त्याला ताब्यात घेउन विचारणा केली असता त्याच्या पिशवीत पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याचे हळद व मीठ लावलेले व उग्र वासाचे कातडे मिळाले.

या प्रकरणी संशयित समीर जयवंत नारकर (वय ३२ रा. मीठबंदर रोड, पिंपळ छाया, गणेश मंदिरजवळ ईस्ट ठाणे मूळ गाव फणसगाव ता. देवगड) याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरूध्द महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.