“….त्यांची संस्कृती कळते,” आढळराव पाटील यांच्या टीकेला अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर

राष्ट्रवादीचे खासदार जरी असाल, तरी प्रकाश झोतात आणण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं आहे, असंही आढळराव पाटील म्हणाले होते.

पुणे- नाशिक महामार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामावरुन राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात आता ठिणगी पडल्याचं दिसून येत आहे

शिरुर लोकसभा मतदारसंघातल्या विकासकामांच्या श्रेयवादावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत संघर्ष होताना दिसून येत आहे. पुणे- नाशिक महामार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामावरुन राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात आता ठिणगी पडल्याचं दिसून येत आहे. आढळराव पाटील यांनी कोल्हे यांच्यावर केलेल्या टीकेला आता त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आज ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.  आढळराव पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, माणूस ज्या शब्दात टीका करतो, त्यावरुन त्याची संस्कृती कळते. त्यामुळे वैयक्तिक बाबींवर टीका करण्यात मला स्वारस्य नाही. कारण, माझ्या शिरुर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, जनतेशी कटिबद्ध आहे. मतदारसंघातल्या विकासकामांबद्दल जनतेला माहिती आहे. त्यामुळे वैयक्तिक चिखलफेक करुन अकारण माझ्या शिरुर मतदारसंघाचं नाव वेगळ्या आणि चुकीच्या कारणासाठी चर्चेत आणणं मला योग्य वाटत नाही. त्यामुळे त्यांच्या टीकेवर कुठलंही उत्तर द्यायची मला आवश्यकता भासत नाही.

हेही वाचा -“कोल्ह्याने उंटाच्या पार्श्वभागाचा मुका घेऊ नये; आपली लायकी काय? आपण बोलतो काय?”

“अमोल कोल्हे यांनी अकलेचे तारे तोडत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी शरद पवार यांच्या आशीर्वादाने आहेत असे वक्तव्य केलं. हे बोलण्याची त्यांची उंची आहे का? कोल्ह्याने उंटाच्या पार्श्वभागाचा मुका घेऊ नये, आपली लायकी काय? आपण बोलतो काय?” अशा शब्दांमध्ये शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली होती.

तसेच, “शिवसेनाप्रमुख आणि उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला मोठं केलं आहे. राष्ट्रवादीचे खासदार जरी असाल, तरी प्रकाश झोतात आणण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.” असं देखील आढळराव यांनी अमोल कोल्हे यांना उद्देशून म्हटलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aadhalrao patil amol kolhe commenting on each other vsk

ताज्या बातम्या