राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात विविध विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुंबई-पुण्यासह राज्यात सगळीकडे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे वसई-विरारमधील नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागला. याच मुद्यांवरून आज विधानसभेत विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहेत.
वसई-विरारमधील पूरस्थितीच्या मुद्यांवरून शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी सरकारला अनेक सवाल विचारले. मात्र, यावेळी सभागृहात कॅबिनेट मंत्री उपस्थित नसल्यामुळे भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे आक्रमक झाले. यावेळी भाजपा आमदार अतुल भातखळकर आणि आमदार आदित्य ठाकरे, आमदार भास्कर जाधव यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे सभागृहात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.
अतुल भातखळकर काय म्हणाले?
“सरकार संवेदनशीलपणे चर्चेला उत्तर देत आहे. मात्र, असं असतानाही सरकार बेताल आहे अशा पद्धतीची असंसदीय भाषा केली जात असेल तर हे चालणार नाही”, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.
भास्कर जाधव काय म्हणाले?
“तुमचं ज्ञान लोकांना माहिती आहे. तुमची कुवत लोकांना माहिती आहे. तुमची झेप लोकांना माहिती आहे. सगळं लोकांना माहिती आहे, त्यात काही नवीन नाही. लय घमेंडखोर, नुसतं बसलाय कोपऱ्यात. प्रत्येक वेळी फक्त अहंकार. तुम्हाला कोणी अधिकार दिला मध्ये बोलायचा? राम मंदिरात चोऱ्या करणारे तुम्ही. यांचं बोलणं अहंकारी आहे. जणू काही तेच सर्वज्ञ आहेत. तुमच्या मर्यादा लोकांना माहिती आहेत. तुमचं ज्ञान, तुमची कुवत, तुमची झेप लोकांना माहिती आहे. फक्त तुम्हाला कळतं आणि बाकीच्यांना काही कळत नाही अशी तुमची वागण्याची पद्धत आहे. तुम्ही कोणाला निष्ठा सांगता? तुम्हाला पक्षात कोणी घेतलं नव्हतं आणि तुम्ही मला निष्ठा शिकवता?”, असं म्हणत भास्कर जाधव चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
वसई-विरारमधील पुरावरुन विधानसभेत जोरदार राडा झाला. यावेळी भास्कर जाधवांनी प्रश्न विचारत उत्तर देण्यासाठी मंत्री कुठे आहेत? असा प्रश्न केला. मात्र, यावरून अतुल भातखळकर यांनी भास्कर जाधव यांच्यावरच टीका केली. यानंतर आदित्य ठाकरे देखील आक्रमक झाले आणि अतुल भातखळकर, आदित्य ठाकरे व भास्कर जाधव यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की, “तुम्ही आम्हाला सांगू नका. राम मंदिर लुटणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये. तुम्ही खाली बसा. नीट बोला, नीट बोला. तुमचं वय झालंय. तुमचं वय पाहून बोला. काय चाललंय?”, असं म्हणत आदित्य ठाकरे हे देखील चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहेत.
