महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष याप्रमाणेच ठाकरे गट आणि शिंदे गट या शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्येही आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. मंगळवारी वरळीत झालेल्या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेतेमंडळींनी ठाकरे गटावर आणि विशेषत: वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर परखड टीका केली. या पार्श्वभूमीवर शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात फिरत असलेल्या आदित्य ठाकरेंनीही शिंदे गटावर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. मात्र, औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात मंगळवारी रात्री आदित्य ठाकरेंच्या सभेदरम्यान दगडफेक आणि बाचाबाचीची घटना घडल्यामुळे त्यावरून नव्याने आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
नेमकं काय घडलं?
वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे शिवसंवाद यात्रेदरम्यान आदित्य ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेदरम्यान काही ठिकाणी वादाचे आणि बाचाबाचीचे प्रसंग निर्माण झाले. सभास्थळाच्या बाजूने जाणाऱ्या एका रॅलीवररूनही वादाचा प्रसंग ओढवला. सभेनंतर आदित्य ठाकरेंच्या गाडीच्या दिशेने काही दगड आले, असा गंभीर दावाही विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेमध्ये कसूर झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात असताना आदित्य ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे सध्या औरंगाबादमध्ये असून प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी महालगावमधील प्रकारावर भाष्य केलं. आमची सभा नीट झाली. काही लोकांना वातावरण बिघडवायचं असेलही. पण या शिवसंवाद यात्रेदरम्यान शेतकरी बांधवांसोबत संवाद होत आहे”, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
आदित्य ठाकरेंच्या सभेत दगडफेकीच्या घटनेवरून अंबादास दानवेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर आरोप, म्हणाले…
यावेळी माध्यम प्रतिनिधींनी अंबादास दानवेंनी केलेल्या आरोपांविषयी विचारणा केली असता त्यावर आदित्य ठाकरेंनीही समर्थनात्मक प्रतिक्रिया दिली. “कदाचित गद्दारांच्या गटाने हे केलं असेल. ठीक आहे. पण आमचा प्रयत्न तर चालू राहील. जिथे गर्दी होत नाही, ज्यांच्याकडे गर्दी होत नाही ते इथे लोक पाठवत असतात”, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी वरळीतल्या सभेचा अप्रत्यक्षपणे उल्लेख करत शिंदे गटावर खोचक टीका केली.
वरळीतील मुख्यमंत्र्यांची सभा आणि गर्दी!
दरम्यान, वरळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असताना समोर रिकाम्या खुर्च्या असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “कुणाचा फ्लॉप शो झाला त्यावर मी आनंद व्यक्त करणाऱ्यांतला नाही. पण एक नक्की आहे की वरळीनं दाखवून दिलंय. अनेक मतदारसंघांनी हे दाखवून दिलंय की प्रामाणिक लोक आणि गद्दार यांच्यातला फरक हा महाराष्ट्र जाणतो. महाराष्ट्रात झालेली गद्दारी कुणालाच पटलेली नाही”.
“मी मुख्यमंत्र्यांना एक सोपं आव्हान देतो, त्यांनी…”, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!
यावेळी आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंनी वरळीचं नुकसान केल्याची टीका केल्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता “त्यांच्याकडे मी लक्षसुद्धा देत नाही” असं म्हणत आदित्य ठाकरेनी त्यावर खोचक प्रतिक्रिया दिली.