Aaditya Thackeray On Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून हे शेवटचे अधिवेशन असल्याचा पुनरुच्चार आदित्य ठाकरेंनी केला आहे. “फडणवीसांनी जोरजबरदस्तीने दिल्लीत खेचलं जाईल आणि मंत्रिपदाची संधी दिली जाईल, भाजपा त्यांना काही महाराष्ट्रात ठेवत नाही”, असा दावा आदित्य ठाकरेंनी आज माध्यमांशी बोलताना केला.

फडणवीसांनी दिल्लीत बोलवतील

“दोन, सव्वा – दोन तास त्यांनी भाषण खेचलं, खूप थापा मारल्या, पण, त्यांचं वैफल्य दिसायला लागलं आहे. मी गेल्या आठवड्यात पण बोललो होतो कदाचित हे अधिवेशन त्यांचं मुख्यमंत्री म्हणून शेवटंच आहे. जोरजबरदस्तीने त्यांना खेचलं जाईल, कॅबिनेट मंत्री म्हणून घेतलं जाईल. शिवराज सिंह चौहान यांना ज्याप्रमाणे घेण्यात आले”, असे आदित्य ठाकरे म्हणाले. ज्या खुर्चीवर बसले आहात त्याला लोक प्रश्न विचारतील, शिव्या देखील का खाव्या लागतील. लोकांच्या प्रश्नाला उत्तरे द्यावी लागतील, महाराष्ट्रात या धमक्यांना बळी पडणार नाही, असेही ठाकरे पुढे म्हणाले.

भाजपा त्यांना काही महाराष्ट्रात ठेवत नाही – आदित्य ठाकरे

“फडणवीस यांची देहबोली पाहता भाजपा त्यांना काही महाराष्ट्रात ठेवत नाही, त्यांना केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाईल, पण त्यांच्यानंतर भाजपाचा मुख्यमंत्री होणार का? शिंदे गटाचा? हे पाहणं महत्वाचं ठरेल. आणि त्यांना पंतप्रधान व्हायचं असेल तर त्यांनी बोलून दाखवावं”, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. कल्याण-डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सेसना झालेल्या मारहाणीप्रकरणी प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरेंनी रमेश म्हात्रे यांचे नगरसेवकपद बरखास्त करावे तसेच, त्यांची धिंड काढण्याची मागणी केली. तरच डॉक्टर आणि नर्सेसना न्याय मिळेल, असेही ठाकरे पुढे म्हणाले.

पवार – शिंदे भेटीवर भाष्य

शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर मत मांडणार नाही, असे आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले. “आम्ही देशाच्या जनतेबरोबर आहोत. कितीही आमिषं दाखवली, कितीही खेचण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही भाजपाबरोबर जाणार नाही. देशविरोधी आणि हिंदूविरोधी कृत्य आम्ही करणार नाही. भाजपा देशद्रोही आहे, हिंदूविरोधी आहे”, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

नितीन गडकरींवर टीका

इथेनॉल ब्लेंडिंग सुरु होईल तेव्हा पेट्रोल १५ रुपये लिटर इंधन होईल हा नितीन गडकरींचा व्हिडीओ असल्याची आठवण आदित्य यांनी सांगितले. “प्रश्न विचारल्यानंतर देशद्रोही, त्यांना व्हिडीओ दाखवल्यानंतर हा व्हिडीओ माझा नाही असं म्हणातात, जगभरात कच्च्या तेलाच्या किंमती कमी होतायेत, भारतातच का होत नाहीत? सर्वत्र इंधनाच्या किंमती कमी झाल्यात, आपल्याकडे का होत नाहीत? गोवा, उत्तर प्रदेश का देशाच्या निवडणुका आल्यानंतर किंमती कमी करणार? मुंबई-गोवा महामार्ग तरी व्यवस्थित करुन दाखवा”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.