शिवसेना (उबाठा गट) नेता आदित्य ठाकरे यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र पाठवत मुंबईतील पहिले मॅन्ग्रोव्ह (खारफुटी) उद्यान नागरिकांसाठी तातडीने खुले करण्याची मागणी केली आहे. ठाकरे यांनी आज (ता. ९ मार्च) पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते पर्यावरण मंत्री असताना पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने मुंबईतील गोराई येथे पहिले मॅन्ग्रोव्ह उद्यान उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रकल्पाची सुरुवात विशेष डीपीडीसी निधीतून करण्यात आली होती.

मुंबईतील हिरवळ वाढवण्याचे उद्दिष्ट

या उद्यानात निसर्गविषयक माहिती केंद्र, मॅन्ग्रोव्ह वॉक ट्रेल, पक्षी निरीक्षण केंद्र अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. येथे विविध पक्षी प्रजाती पाहायला मिळतात, तसेच स्थलांतरित पक्ष्यांचेही दर्शन घडते. या प्रकल्पामागील मुख्य उद्दिष्ट नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि मुंबईतील हिरवळ वाढवणे हे असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

इतर ठिकाणीही मॅन्ग्रोव्ह उद्याने उभारली पाहिजेत- ठाकरे

महाराष्ट्र वन विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या प्रकल्पाचे उद्घाटन २०२४ मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र अनेक वेळा उद्घाटनाच्या तारखा जाहीर होऊनही हे उद्यान अद्याप नागरिकांसाठी खुले झालेले नाही, असेही ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे हे उद्यान तातडीने सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात यावे जेणेकरून विद्यार्थी आणि नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल, अशी विनंती त्यांनी वनमंत्र्यांना केली आहे. तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणीही अशा प्रकारची मॅन्ग्रोव्ह उद्याने उभारण्याचा विचार करावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

“उद्घाटनासाठी अनेक तारखा जाहीर पण…”

आदित्य ठाकरे यांनी मंत्री गणेश नाईक यांना गोराई येथील खारफुटी उद्यानाचे उद्घाटन करण्याची विनंती केली आहे. ते म्हणाले की, पर्यावरण मंत्री (२०१९–२२) म्हणून मला हे काम सुरू करण्याचा मान मिळाला आणि गेल्या वर्षीपासून हे काम पूर्ण झाले आहे. उद्घाटनासाठी अनेक तारखा जाहीर झाल्या आहेत, मात्र तरीही हे उद्यान नागरिकांसाठी बंदच आहे. ते खुले केल्यास नागरिकांना खारफुटी परिसंस्थेच्या अधिक जवळ जाता येईल आणि तिचे महत्त्व अधिक अधोरेखित होईल. यासाठी मी पहिले पत्र गेल्या वर्षी मे महिन्यात लिहिले होते, असेही त्यांनी नमूद केले.

खारफुटी संवर्धन हा माझ्यासाठी प्राधान्याचा विषय होता आणि मंत्री म्हणून माझ्या कार्यकाळात सहकाऱ्यांच्या टीमसोबत आम्ही केवळ ११ महिन्यांत १५,००० हेक्टर खारफुटींना भारतीय वन कायद्यांतर्गत संरक्षण दिले, असेही त्यांनी सांगितले. तसेच हे उद्यान लवकरात लवकर सुरू करावे, अशी विनंतीही ठाकरे यांनी केली आहे.