Aditya Thackeray शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर लवकरच शिवसेनेकडून मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची धुरा दिली जाणार आहे. आदित्य ठाकरेंना पक्षाकडून १९ जून रोजी पक्षाच्या वर्धापनदिनी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. यामुळे शिवसेनेतील आदित्य ठाकरे यांचं महत्त्व वाढणार असून त्यांच्याकडे मोठ्याप्रमाणावर अधिकार येतील, असं सांगितलं जातं आहे.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
उद्धव ठाकरे सुद्धा कालांतराने पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते. जर आदित्य ठाकरे यांचे नाव आपल्या माध्यमातून समोर आले असेल त्याचे स्वागत केले पाहिजे. नक्कीच आता, तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. पुढलं राजकारण तरुणांच्या हातात गेले पाहिजे. आदित्य ठाकरेंबद्दल खासगीत नेते काय बोलतात, त्याला अर्थ नसतो. मुंबई महानगरापलिकेच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी आणि त्यांच्या टीमने उत्तम काम केले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे ज्यानंतर या चर्चा सुरु झाल्या आहेत.

आदित्य ठाकरेंकडे २०१० मध्ये युवासेनेचं अध्यक्षपद
२०१० च्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचा नातू म्हणजेच आदित्य ठाकरेंना युवासेनेची जबाबदारी दिली होती. त्यावेळी तलवार उंचावून आदित्य ठाकरेंनी अभिवादन केलं होतं. त्यावेळी आदित्य ठाकरेंवर काँग्रेसमध्ये असलेल्या नारायण राणेंनी टीका केली होती. कारण आदित्य ठाकरे हे तेव्हा अवघ्या २० वर्षांचे होते. यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच २०१२ च्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंनी व्हिडीओ संदेश पाठवला होता. त्यात उद्धव आणि आदित्य यांना सांभाळा असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. नोव्हेंबर २०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आदित्य ठाकरे शिवसेनेत अधिक सक्रिय झाले.
२०१७ नंतर आदित्य ठाकरेंनी पक्ष बांधणीसाठी केलं काम
आदित्य ठाकरे यांनी २०१७ नंतर पक्षबांधणीसाठी मोठ्या प्रमाणावर काम केल्याचं पाहण्यास मिळालं. पण आदित्य ठाकरे यांची पद्धत ही आजोबा बाळासाहेब ठाकरेंसारखी आक्रमक नाही. तर त्यांच्या वडिलांप्रमाणे म्हणजेच उद्धव ठाकरेंप्रमाणे संयमी आहे. आता आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष केलं जाईल अशा चर्चा रंगल्या आहेत. संजय राऊत यांनी याबाबत सूचक विधान केलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आदित्य ठाकरेंनी मुंबईचं नाईटलाईफ, विद्यापीठांमधील निवडणुका, मुंबईतल्या राणीच्या बागेचं सुशोभीकरण आणि तिथे पेंग्विन आणण्यासाठी केलेले प्रयत्न, मरीन लाइन्स परिसरात तरुणांसाठी ओपन जिम अशा काही गोष्टींसाठी सक्रिय सहभाग घेतला.

विधानसभा निवडणूक लढलेले पहिले ठाकरे म्हणजे आदित्य ठाकरे
२०१४ ते २०१९ या कालावधीत भाजपा आणि शिवसेनेची सत्ता महाराष्ट्रात होती. या कालावधीत आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिकेच्या ज्या निवडणुका २०१७ मध्ये झाल्या त्यासाठीही बऱ्याच प्रमाणावर काम केलं. तर २०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक लढवणारे ठाकरेंच्या घराण्यातले ते पहिले ठाकरे ठरले. मुंबईतल्या वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडून आले. त्यांचे काका राज ठाकरे यांनी आदित्य ठाकरे उभे असल्याने त्यांच्याविरोधात त्यावेळी उमेदवार दिला नव्हता. दसरा मेळाव्यातही आदित्य ठाकरे भाषण करु लागले होते. दरम्यान २०१९ ला महाविकास आघाडीचं जे सरकार आलं त्यात आदित्य ठाकरे मंत्री होती अशी शक्यता कुणालाही वाटली नव्हती. पण तो निर्णय झाला आणि आदित्य ठाकरे हे मंत्रीही झाले.
२०१९ मध्ये आदित्य ठाकरेंकडे मंत्रिपद
२०१९ ला शिवसेना आणि भाजपा यांच्यात मुख्यमंत्रिपद समान वाटून घेण्यावरुन जो वाद झाला तेव्हा युती तुटली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह आघाडी केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्याच मंत्रिमंडळात आदित्य ठाकरेंकडे मंत्रिपद आलं. आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे पर्यावरण खात्याचे मंत्री होते. महाविकास आघाडीचं सरकार जून २०२२ पर्यंत टिकलं. पुढे एकनाथ शिंदेंचं बंड झालं आणि शिवसेनेत उभी फूट पडली. पण अडीच वर्षांच्या या संपूर्ण कालावधीत आदित्य ठाकरेंनी भाजपावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही.
भाजपाकडूनही टीका, पेंग्विन असं म्हणत उडवली गेली खिल्ली
२०१९ ते २०२२ या कालावधीत भाजपाचे नेते नितेश राणे विरुद्ध आदित्य ठाकरे असा सामना पाहण्यास मिळाला. नितेश राणे यांनी अनेकदा आदित्य ठाकरेंचा उल्लेख पेंग्विन असा केला आणि त्यांच्या आवाजाची नक्कल करुन त्यांना डिवचण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र आदित्य ठाकरे शांत राहिले किंवा जेव्हा उत्तर दिलं ते संयमाने दिलं. अभ्यासपूर्ण वक्तव्यं आदित्य ठाकरे हळूहळू करु लागले. प्रेझेंटेशन देऊन पत्रकार परिषद घेण्याचा ट्रेंडही आदित्य ठाकरेंनी आणला.
२०२२ मध्ये पक्ष फुटल्यानंतर केला महाराष्ट्र दौरा
जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंनी थेट उद्धव ठाकरेंना आव्हान देत शिवसेनेतलं आजवरचं सर्वात मोठं बंड केलं. शिवसेना हे नाव आणि शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण हे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंना दिलं. पक्षात एवढी मोठी फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरेंनी महत्त्वाची भूमिका बजावली ती म्हणजे महाराष्ट्राचा दौरा करत जे पक्षात होते त्या सगळ्यांना आणि शेकडो कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम केलं. एकनाथ शिंदे, त्यांच्यासह गेलेले आमदार यांच्याविरोधात आक्रमक भाषणं केली. उद्धव ठाकरेंनी कशी सगळ्यांना पदं दिली होती तरीही हे सगळे कसे उलटले? हे सांगण्याचं काम त्यांनी केलं. तसंच भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंना खुल्या चर्चेसाठी या असं म्हणत आव्हानही दिलं. त्यांचा हा दौरा शिवसेनेत राहिलेली ताकद कायम ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला.
२०२४ मध्ये पुन्हा एकदा आमदारकी
२०२४ मध्ये आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा वरळी मतदारसंघातून निवडून झाले. त्यानंतर विधानसभेत विरोधी बाकांवर बसूनही ते आक्रमक शैलीत आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने अनेक प्रश्न मांडताना दिसून येतात. मात्र आदित्य ठाकरेंना त्यांचे काका राज ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा खणखणीत आवाज लाभलेला नाही. तरीही युवा वर्गात आदित्य ठाकरेंबाबत विशेष प्रेम आणि आपुलकी दिसून येते.
२०२६ च्या महापालिका निवडणुकीत जोरदार प्रचार
२०२६ मध्ये मुंबईसह राज्यातल्या २८ महापालिकांची निवडणूक पार पडली. त्या निवडणुकीच्या आधी जो प्रचार सुरु झाला होता त्यात आदित्य ठाकरे पुन्हा योग्य पद्धतीने सक्रिय झाल्याचं पाहण्यास मिळालं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवली. ही निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जिंकता आली नाही. पण या पक्षाने चांगली कामगिरी केली हे मान्यच करावं लागेल.
आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार का?
आदित्य ठाकरेंकडे कार्याध्यक्ष हे पद दिलं जाणार अशा चर्चा सध्या रंगल्या आहेत. आदित्य ठाकरेंनी तूर्तास हे वृत्त नाकारलं आहे. पण जर असं घडलं तर आदित्य ठाकरेंकडे एक मोठी जबाबदारी येईल, त्यांना कार्याध्यक्ष केलं जाईल का? हे १९ जूनला हे स्पष्ट होईल. पण असं घडलं तर २००३ मध्ये जसे उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाले होते त्याप्रमाणे एक वर्तुळ पूर्ण होऊन आदित्य ठाकरे यांच्याकडे ते पद येईल.
