Aaditya Thackeray on VHP : विश्व हिंदू परिषदेकडून नवरात्रोत्सवात मुस्लिमांना गरबा आणि दांडिया कार्यक्रमात बंदी, तसेच हिंदूंची ओळख पडताळण्यासाठी उपस्थितांची आधार तपासणी आणि कपाळावर टिळा लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनावर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे युवा आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच दिल्लीतील सत्य निकेतन भागात इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेवरून त्यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ते काल रात्री मुलुंड येथे पत्रकारांशी बोलत होते.
‘आम्हाला हिंदुत्वाचे प्रमाणपत्र देणारे हे कोण?’ – आदित्य ठाकरे
विहिंपच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेत आदित्य ठाकरे म्हणाले, “आम्हाला हिंदुत्वाचं प्रमाणपत्र देणारे हे लोक कोण आहेत? प्रश्न असा आहे की, मुंबईत गरबा असो, नवरात्री, दहीहंडी असो वा गणपती उत्सव, इथे दिसणाऱ्या प्रत्येकाची पहिली ओळख हीच असते की ते मुंबईकर आहेत. ते कोणतीही भाषा बोलत असोत, कोणत्याही राज्यातून आलेले असोत, किंवा त्यांचा धर्म आणि जात काहीही असो, ते सर्व बाप्पासाठी येतात. ते कोणत्याही विशिष्ट व्यक्तीसाठी येत नाहीत. बाप्पा हा सर्वांचा आहे.”
आकडे बरोबर आहेत मग सोनं का खरेदी करू नये?
दरम्यान, वाढलेल्या जीडीपीवरही आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, हे आकडे बोगस आहेत.या आकड्यांविरोधात जे बोलतील त्यांना दिमागी नक्षल म्हटलं जातं. हे आकडे बरोबर आहेत तर दिल्लीच्या विमानतळावर पाणी का साचलं? आकडे बरोबर आहेत तर नोकऱ्या कुठे आहेत? रस्त्यांवर खड्डे का आहेत? सोनं का खरेदी करू नयेत? परदेशात का जाऊ नये?” असे सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले.
दिल्लीतील इमारत अपघातावरून सरकारवर टीका
दिल्ली विद्यापीठाजवळील सत्य निकेतन भागात झालेल्या इमारत दुर्घटनेवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “दिल्ली विद्यापीठाच्या परिसरात एक इमारत कोसळली आहे, हे आपण पाहू शकता. ही अत्यंत गंभीर बाब आहे. पण सरकार मात्र केवळ विद्यार्थ्यांना टार्गेट करण्यात व्यस्त आहे.”
विहिंपचं नेमकं आवाहन काय होतं?
विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि सहसचिव श्रीराज नायर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले, “नवरात्री उत्सवादरम्यान गरबा-दांडिया सारख्या कार्यक्रमात मुस्लिमांना प्रवेश द्यायचा नाही, असे आम्ही ठरवले आहे.” तसेच हिंदूंची ओळख पडताळण्यासाठी उपस्थितांची आधार तपासणी आणि कपाळावर टिळा लावण्याचे आवाहनही व्हिएचपीने केले आहे.
