Aaditya Thackeray protest NEET paper leak: नीट पेपरफुटीप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या १९ दिवसांपासून दिल्लीत उपोषण करत आहेत. कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपकेंनी उभारलेल्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा वाढत असताना, वांगचुक आणि दिपके यांच्या समर्थनात आदित्य ठाकरेंनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. वांगचुक आणि दिपकेंना पाठिंबा देण्यासाठी रविवारी (१९ जुलै) शिवतीर्थावर एकत्र येण्याचे आवाहन आदित्य ठाकरेंनी केले आहे. “हा लढा राजकीय पक्षाचा नसून, सर्वांचा आहे”, असेही ठाकरेंनी म्हटले आहे.
वांगचुक आणि दिपके यांच्या समर्थनात आदित्य ठाकरेंनी मैदानात
नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि मृत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंनी आंदोलन उभारले आहे. दिल्लीत गेल्या २५ दिवसांपासून हे आंदोलन सुरु आहे. यात सोनम वांगचुक यांनी सहभागी होत उपोषणाची हाक दिली. गेल्या १९ दिवसांपासून वांगचुक उपोषण करत असून, सरकारकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान, वांगचुक यांच्या समर्थनात अनेक राजकीय नेते, अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते उतरले आहेत. आदित्य ठाकरेंनी देखील आता वांगचुक आणि दिपकेंच्या समर्थनात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
रविवारी एकत्र येण्याचे आवाहन
वांगचुक, दिपके आणि युवकांनी पाठिंबा देण्यासाठी व भाजपा सरकारला जाब विचारण्यासाठी एकत्र येऊया, असे आवाहन आदित्य ठाकरेंनी केले आहे. १९ जुलै, रविवारी, शिवतीर्थावर, माँसाहेब मिनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ ४ वाजता एकत्र येण्याचे आवाहन आदित्य यांनी केले आहे. “हा लढा राजकीय पक्षाचा नसून, सर्वांचा आहे”, असेही ठाकरेंनी पुढे म्हटले आहे. उद्धव ठाकरेंनी देखील काही दिवसांपूर्वी दिपके आणि वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आता आदित्य यांनी दिपके आणि वांगचुक यांच्या समर्थनात प्रत्यक्ष रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारवर टीका
आदित्य ठाकरेंनी आज एक्स सोशल मीडियावर पोस्टकरुन भाजपा सरकारविरोधात एकत्र येण्याची गरज व्यक्त केली होती.
“वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेश परीक्षांमधील पेपरफुटीसारख्या गंभीर प्रकारानंतरही इतके अकार्यक्षम केंद्रीय मंत्री कोणत्याही देशात पदावर राहिले नसते. पेपरफुटी असो, इथेनॉलचा प्रश्न असो किंवा मंदिरांचा मुद्दा… भाजपचे एकच धोरण आहे, लोकांमध्ये फूट पाडायची आणि स्वतःची सत्ता टिकवायची”, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली आहे.
