Aaditya Thackeray Disha Salian Case CBI FIR Reaction: दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणात एफआयआरमध्ये आदित्य ठाकरेंचं नाव असल्याचा दावा सतिश सालियन यांनी केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू झाली असून आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं जात आहे. याप्रकरणात आदित्य ठाकरे यांनी यापूर्वीही फारशी वाच्यता केलेली नाही. मात्र, आता त्यांनी यावर मौन सोडलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत मोठा खुलासा केला आहे.
“अफवांचा धुरळा उडवणं बंद करण्यासाठी पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तथ्य सांगतो!”, असं म्हणत आदित्य ठाकरे म्हणाले, “मी दिशा सालियान यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती. राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या ६ वर्षांपासून वारंवार ह्या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही माझं नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरू आहे.”
“कुठलंही तथ्य आणि सत्य नसलेलं हे सततचं खोटं कॅंपेन दुर्दैवी आहे. बोंबाबोंब करून केल्या जाणाऱ्या टिव्ही चॅनल्सवरच्या खोट्या चर्चा आणि मिडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत. अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करू द्या. परत एकदा सांगतो, ज्यांना वाटत असेल की अशा चारित्र्यहननाच्या आणि खोट्या प्रचाराच्या मार्गाने तुम्ही आम्हाला शांत बसवू शकाल तर तो तुमचा भ्रम आहे. सत्यासाठी, अन्यायाविरुद्ध, देशवासीयांना सोबत घेऊन आमचा लढा सुरुच राहील!”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरेंची चौकशी होणार?
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाशी संबंधित सर्वांनाच चौकशीसाठी पाचारण केले जावे, अशी अपेक्षा दिशाचे वडिल सतीश सालियन यांनी केली आहे. सीबीआयने नियमित प्रकरण (आरसी) म्हणून दाखल केलेल्या गुन्ह्यात फिर्यादीने दिलेल्या सर्वांचे जबाब नोंदविण्याची पद्धत असते. त्यामुळे या फिर्यादीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह पोलीस आयुक्त परमबीर सिंग तसेच मालवणी पोलीस ठाण्याचे तसेच शवविच्छेदन करणारे, न्याय वैद्यक प्रयोगशाळेतील सर्व संबंधित यांना चौकशीसाठी बोलवावे, असेही या जबाबात नोंदविण्यात आले आहे.
याशिवाय दिशाचा मृत्यू झाला त्यादिवशी हजर असणारे सर्व तिचे मित्र, सहकारी तसेच ज्या इमारतीत तिचा मृतदेह आढळला, त्या मालवणीतील जनकल्याण नगरातील रिजेन्ट गॅलेक्सी या इमारतीतील सुरक्षा रक्षक आदी सर्वांची नावे या तक्रारीत आहेत. या सर्वांना सीबीआयने पाचारण करुन सुरुवातीपासून या प्रकरणाचा तपास करावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
