Aditya Thackeray Defamation Notice Reply: शिवसेनेचे (ठाकरे) नेते, आमदार आदित्य ठाकरे यांना दिवंगत दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी ५०० कोटी रुपयांची अब्रूनुकसानीची नोटीस दिली होती. सालियन आणि त्यांच्या वकिलांनी १९ सप्टेंबर रोजी मातोश्रीवर जाऊन नोटीस सुपुर्द केल्यामुळे वाद उद्भवला होता. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी या नोटिशीला उत्तर दिले असून सतीश सालियन यांची माफी मागण्यास किंवा ५०० कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यास त्यांनी नकार दिला आहे. तसेच त्यांना बजावलेली नोटीस निरर्थक आणि कायदेशीरदृष्ट्या असमर्थनीय असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
हिंदुस्तान टाइम्सने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलेले आहे. आदित्य ठाकरे यांच्या वतीने वकील अंशुमन सिन्हा यांनी सतीश सालियन यांच्या नोटिशीला २५ पानी उत्तर दिले आहे. दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर असलेल्या दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर मराठी आणि इंग्रजीमध्ये एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टनंतर सतीश सालियन यांनी ही नोटीस बजावली होती.
आदित्य ठाकरेंच्या वतीने दिलेल्या उत्तरात असे नमूद करण्यात आले आहे की, सोशल मीडियावर लिहिलेल्या इंग्रजी आणि मराठी पोस्टमध्ये सतीश सालियन यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे सदर पोस्ट त्यांच्याविरुद्ध बदनामीकारक आरोप ठरू शकत नाही. तसेच दिशा सालियनच्या मृत्यूशी त्यांचा संबंध जोडून दीर्घकाळापासून जे राजकीय आरोप आणि माध्यमातून अपप्रचार होत आहे, त्याला उत्तर म्हणून त्यांनी ही पोस्ट लिहिली होती, असेही आदित्य ठाकरेंच्या उत्तरात नमूद केले आहे.
उच्च न्यायालयाचा आदेश आणि सीबीआयचा तपास
- जून २०२० मध्ये मालाड येथील एका इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून पडून दिशा सालियनचा मृत्यू झाला होता.
- २ सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले. पोलीस चौकशी अपुरी असल्याचे सांगून हे आदेश दिले गेले.
- १२ सप्टेंबर रोजी सीबीआयने सतीश सालियन यांचा जबाब नोंदवून घेतल्यानंतर या प्रकरणी एफआयआर दाखल केला.
- १६ सप्टेंबर रोजी आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर दोन पोस्ट शेअर करत या प्रकरणावर भाष्य केले होते. तसेच दिशा सालियनला आपण ओळखतही नव्हतो, असे सांगितले.
- १९ सप्टेंबर रोजी दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मातोश्रीवर जाऊन आदित्य ठाकरेंच्या वकिलाकडे ५०० कोटींच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याची नोटीस दिली.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आतापर्यंत काय झाले?
मुंबई पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली होती. पोलिसांच्या चौकशीत घातपाताचा कोणताही पुरावा आढळला नव्हता. त्यामुळे सदर मृत्यू आत्महत्या असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. डिसेंबर २०२३ मध्ये या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात आली. परंतु एप्रिल २०२६ मध्येही पूर्वीचाच निष्कर्ष काढून तपास बंद करण्यात आला.
मात्र सतीश सालियन यांनी घातपाताचा संशय व्यक्त करत या प्रकरणात काही शक्तीशाली लोकांना वाचविले जात असल्याचा आरोप केला.
