मुंबई: शिवसेनेत (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी टाकण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात येणार असून यासाठी १९ जून रोजी शिवसेनेच्या वर्धापनदिनाचा मुहूर्त ठरविण्यात आल्याचे समजते. २०१२ साली उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाल्यानंतर कार्याध्यक्षपद रिक्त असून या जागी आदित्य ठाकरे यांची निवड झाल्यास पक्षाचे महत्त्वाचे अधिकार त्यांच्याकडे येणार आहेत.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकांपासून आदित्य ठाकरे हे राजकारणात सक्रिय झाले. २०१९ साली उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात पर्यावरणमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्याकडे शिवसेनेतील महत्त्वाचे पद सोपविले जाणार आहे. शिवसेनेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीदरम्यान आदित्य ठाकरे यांच्यावरील जबाबदारीची जाणीव पदाधिकाऱ्यांना करून देण्यात आली. त्यानंतरच याविषयी अंतिम निर्णय घेण्यात आला. राज्यातील महत्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपल्या आहेत. आता थेट २०२९ मध्येच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होतील. या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून संघटनात्मक बांधणीची आखणी ठाकरे गटात सुरू आहे. त्यामुळेच आदित्य ठाकरे यांना पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नेमण्याचा निर्णय झाल्याचे समजते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना महाबळेश्वर येथील बैठकीत २००३ साली शिवसेना कार्याध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांची घोषणा करण्यात आली होती. २०१२ साली ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांची पक्षप्रमुख म्हणून निवड करण्यात आली. मागील काही काळापासून प्रकृतीच्या कारणास्तव उद्धव ठाकरे यांच्यावर प्रवासाच्या मर्यादा येत आहेत. आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रभर फिरावे अशी मागणी शिवसेना नेत्यांकडूनही केली जात आहे. त्यामुळे कार्यध्यक्षपदाच्या निमित्ताने ठाकरे गटाचे भावी नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे यांना पुढे आणण्यात येणार आहे.
संजय राऊतांकडून समर्थन, आदित्य ठाकरेंकडून इन्कार
शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी याला दुजोरा देताना पक्षाला नव्या रक्ताची गरज असल्याचे सांगितले. तरुणांना संधी दिली पाहिजे, ही काळाची गरज आहे. आदितय ठाकरे हे सध्या पूर्ण ताकदीने महाराष्ट्र दौरा करीत आहेत. त्यांना मिळालेला प्रतिसाद पाहता पक्षाच्या संघटनात्मक रचनेत बदल होणे स्वाभाविक असल्याचे म्हणत त्यांनी या वृत्तावर शिक्कामोर्तब केले. मात्र आदि्य ठाकरे यांच्याकडून मात्र याचा इन्कार करण्यात आला असून यासंदर्भात त्यांनी ‘एक्स’ समाज माध्यमातून आपले म्हणणे मांडले. अशा प्रकारची कोणतीच चर्च पक्षात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
