Aaditya Thackeray slams BJP over Ram Mandir scam controversy: अयोध्येतील श्री राम मंदिरातील दान आणि देणगी गैरव्यवहार प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. आठ संशयितांकडून आतापर्यंत ७९ लाख जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी देशभरातील विरोधी पक्षातील नेते टीका करत असताना आता आदित्य ठाकरेंनीही यावर भाष्य केले आहे.

आदित्य ठाकरे यांनी इंडिया टुडे वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अयोध्येतील प्रकरणावरून भाजपावर टीका केली. अयोध्येत राम मंदिर व्हावे, यासाठी शिवसेनेने लढा दिला होता, याची आठवण आदित्य ठाकरे यांनी सांगितली. तसेच अयोध्येत मंदिर व्हावे यासाठी पक्षाने २०१८ साली घेतलेली मोहीम आणि मंदिराला दिलेल्या देणग्यांचीही माहिती दिली.

आदित्य ठाकरे म्हणाले, २०१८ साली राम मंदिराचा विषय भाजपाच्या विस्मृतीत गेला होता. तेव्हा आम्ही अयोध्येचा दौरा केला आणि ठामपणे म्हटले, “आधी मंदिर, मग सरकार”. तेव्हा कुठे भाजपाला याची आठवण झाली. आज जे राम मंदिर उभे आहे, त्याबद्दल भाजपाचे नाही तर सर्वोच्च न्यायालयाचे आभार व्यक्त करायला हवेत.”

मात्र राम मंदिराच्या प्रशासनावर बाहेरील व्यक्तीची नेमणूक केल्यामुळे तिथे गोंधळ निर्माण झाला आहे. पारदर्शकता आणि सचोटीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. भाजपाने राम मंदिर ट्रस्टवर ज्या लोकांची नेमणूक केली होती, त्यांच्याकडून जो गैरव्यवहार झाला, त्यामुळे आमच्या श्रद्धेला धक्का पोहोचला, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

बाबर जनता पार्टी

आदित्य ठाकरेंनी केंद्रातील सत्ताधारी भाजपाची तुलना मुघलांशी केली आणि बीजेपीला बाबर जनता पार्टी असे संबोधले. राम मंदिराबरोबरच आदित्य ठाकरेंनी मध्य प्रदेशच्या उज्जैन येथे जमीन वाटपात घोटाळा झाल्याचेही म्हटले. मध्य प्रदेशमध्ये भाजपाचे मुख्यमंत्री मोहन यादव यांचे सरकार आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, भाजपा आता मुघलांप्रमाणेच वागत आहे. तर त्यांच्यात आणि मुघलांमध्ये फरक काय राहिला?

माझ्या कौटुंबिक वारशाचा अभिमान

तृणमूल काँग्रेस आणि देशभरातील काही प्रादेशिक पक्ष एकाच कुटुंबाकडून चालवले जात असल्याची टीका होते. शिवसेनेबद्दलही (ठाकरे) हेच बोलले जाते का? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांना इंडिया टुडेच्या मुलाखतीत विचारण्यात आला होता. यावर आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, मला माझ्या कुटुंबाच्या वारशाचा अभिमान वाटतो.

भाजपाकडून इतर पक्षांवर घराणेशाहीचा आरोप करण्यात येत असतो. प्रादेशिक पक्षांमधील घराणेशाहीमुळे त्या पक्षातील इतर नेते स्वातंत्र्य आणि चांगली संधी मिळविण्याच्या शोधात पक्ष सोडतात. यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, मला माझ्या कुटुंबाच्या वारशाचा अभिमान वाटतो. मात्र नेतृत्वावरील शिक्कामोर्तब हे मतपेटीतून होत असते. जर लोकांनी मला स्वीकारले, तर पक्षही मला स्वीकारेल आणि मागच्या दोन निवडणुकांत लोकांनी मला निवडून दिलेले आहे.