आज मराठी भाषा दिनानिमित्त राज्यभर वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जात आहेत. मुंबईत अशाच एका कार्यक्रमाला शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमानंतर बोलताना आदित्य ठाकरे यांनी सर्वांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, दुसरीकडे मुंबईत महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी प्राप्तीकर विभागाकडून सुरू असलेल्या छापेमारीवर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. एबीपीशी बोलताना त्यांनी भाजपावर तोंडसुख घेतलं आहे.

“मराठी भाषा दिन हा आपल्यासाठी महत्त्वाचा दिवस असतो. सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. जगभरात आजचा दिवस साजरा करायला हवा”, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

दरम्यान, मुंबई महानगर पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी सुरू असलेल्या प्राप्तीकर विभागाच्या छापेमारीवरून त्यांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे. हे सगळं राजकारणासाठीच केलं जातंय. हा भाजपाचा प्रचार सुरू झालाय. आज सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की बंगाल पॅटर्न असेल किंवा महाराष्ट्र पॅटर्न असेल, अशा गोष्टी केंद्रीय यंत्रणांकडून वाढत जाणार. निवडणुकीपर्यंत हे सगळं होत जाणार”, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

“जेवढं हे लोक केंद्रातून दबाव आणण्याचा प्रयत्न करतील, तेवढा महाराष्ट्र एकवटेल आणि महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहील”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरेंच्या राजकीय भवितव्याविषयी उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “बाळासाहेब मला म्हणायचे…”!

यशवंत जाधव यांच्या घरी धाडी का?

शिवसेनेचे माझगावमधील नगरसेवक व स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी शुक्रवारी सकाळी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. त्यानंतर आज तिसऱ्या दिवशी देखील छापेमारी सुरूच असल्याचं सांगितलं जात आहे. सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक झाली असतानाच यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. पालिकेची निवडणूक लवकरच अपेक्षित असून पालिकेतील शिवसेनेचा सर्वात मोठा नेताच चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यामुळे शिवसेनेत काळजीचे वातावरण पसरले आहे.

यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी प्राप्तिकर छापा; मुंबईत ३३ ठिकाणी शोधमोहीम

यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव या दक्षिण मुंबईतील आमदार असून जाधव पती-पत्नी शिवसेना पक्षप्रमुखांच्या जवळचे मानले जातात. विधानसभा निवडणुकीच्या वेळी आमदार यामिनी जाधव यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाबाबत चुकीची माहिती दिल्याच्या आरोपावरून ही चौकशी सुरू झाल्याचे समजते. तपास सुरू असल्याने जाधव यांचे निवासस्थान असलेल्या इमारतीबाहेर मोठय़ा प्रमाणात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.