Aaditya Thackeray: विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने उरले असताना आता शिवसेना शिंदे गटानं त्यांच्या आमदारांना महामंडळ देऊ केले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्या गटातील काही आमदार मंत्रि‍पदासाठी आग्रही होते. रायगडमधील महाडचे आमदार भरत गोगावले यांनी तर कोट शिवून ठेवल्याचे जाहीर सांगितलं होतं. मात्र २०२३ रोजी अजित पवार यांच्या गटाला सत्तेत सामावून घेतल्यामुळं त्यांच्या आमदारांना मंत्रीपदं दिली गेली. ज्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि भाजपामधील निष्ठावंतांना मंत्रि‍पदापासून दूर राहावं लागलं. अखेर निवडणुकीच्या तोंडावर काही जणांची वर्णी महामंडळावर लावली गेली. यावर आता शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट टाकून शिवेसना शिंदे गटावर खोचक टीका केली. “खेचून, रडून, ओढून-ताणून मिंधेंनी तीन गद्दारांना महामंडळाचं अध्यक्ष वगैरे केलं… ज्यांना राज्यपाल, मंत्रीपदांचं चॉकलेट दाखवलं होतं, ज्यासाठी सुरतला पळून जायला लावलं होतं, ३३ देशात गद्दार म्हणून प्रसिद्ध केलं, त्यांना आता निवडणुकीच्या तोंडावर, राजवटीचे मोजके दिवस उरले असताना ही मंडळं देऊन गप्प केलं!”, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

हे वाचा >> आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?

याच पोस्टमध्ये ते पुढे म्हणाले, “कौतुक आहे ह्यांचं… काय स्वप्नं घेऊन पळाले होते!
एका स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवलात, तर असाच विश्वासघात होतो! बरं हे होताना अजून कौतुक वाटतं ते भाजपा कार्यकर्त्यांचं… २ वर्षात, आमचं सरकार पाडून, पक्ष फोडून, कुठच्या खऱ्या भाजपा कार्यकर्त्याला काही मिळालं? मिंधे नी परस्पर पद देऊन टाकली… ह्यांचं काय? महाराष्ट्राला मागे खेचण्यात मिळालेलं यश सोडून भाजपाला काय मिळालं?”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदासाठी आग्रह करणाऱ्या संजय शिरसाट यांना सिडकोचे अध्यक्षपद दिले आहे. तर भरत गोगावले यांना एसटी महामंडळाचे अध्यक्षपद दिले आहे. तसेच लोकसभेला उमेदवारी नाकारलेल्या आनंदराव अडसूळ यांची नियुक्ती अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. तर माजी खासदार हेमंत पाटील यांना हळद संशोधन केंद्राचे अध्यक्षपद दिले गेले आहे. तत्पूर्वी रामदास कदम यांचे सुपुत्र आणि खेडचे आमदार सिद्धेश कदम यांना पर्यावरण प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्षपद दिले गेले.

भरतशेट यांच्या कोटाचं काय झालं?

महाडचे आमदार भरत गोगावले हे आपल्या बिनधास्त विधानांसाठी परिचित आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रि‍पदाची शपथ घेण्यासाठी मी कोट शिवून ठेवलाय, असे विधान भरत गोगावले यांनी केले होते. यानंतर त्यांनी या विधानाचा वारंवार उल्लेख केला होता. मात्र अखेर त्यांना मंत्रीपद मिळालेच नाही. त्यावरून आता शिवसेना उबाठा गटाने आता त्यांना ट्रोल केले आहे. गोगावले यांचा विधानांच्या व्हिडीओचे मिम बनवून व्हायरल करण्यात येत आहेत.