aaditya thackeray speech targets cm eknath shinde vedanta foxconn project | Loksatta

“या खोके सरकारचं लक्ष फक्त गटात…”, आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल!

आदित्य ठाकरे म्हणतात, “…हे जर राजकारण असेल, तर ठीक आहे. करतो आम्ही राजकारण. पण मग राजकारण करायचं कशासाठी असतं?”

“या खोके सरकारचं लक्ष फक्त गटात…”, आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल!
संग्रहित फोटो

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापासूनच सत्ताधारी आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यामध्ये जोरदार कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. मग ती ‘खोके सरकार’ म्हणून केलेली टीका असो किंवा सत्ताधाऱ्यांनी ‘आदित्य ठाकरेंची ‘दिशा’ चुकली’ असं म्हणत लगावलेला खोचक टोला असो. नुकतंच वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प राज्यातून गुजरातला गेल्यावरून राजकारण पेटल्याचं दिसून येत आहे. या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी सातत्याने सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषत: एकनाथ शिंदे गटावर टीकास्र सोडलं आहे. हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा निषेध करण्यासाठी आदित्य ठाकरेंच्या नेतृत्नात तळेगावमध्ये जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरेंनी सरकारवर परखड शब्दांत हल्लाबोल केला.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

“प्रकल्पावर आम्ही बोलल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र रोष दिसून येत आहे, दु:ख आहे. महाराष्ट्रात येऊ शकणारा प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेला. वेदान्त-फॉक्सकॉन, बल ट्रक पार्क आणि मेडिसिन डिव्हाईस पास्क हा प्रकल्पही आता महाराष्ट्रातून निघून गेला आहे. या खोके सरकारचं लक्ष त्यांच्या गटात कोण येतंय, याकडे आहे. पण राज्यात उद्योग कोणते येत आहेत, गुंतवणूक कोण घेऊन येतंय याकडे कुणाचंच लक्ष नाहीये”, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

“मुख्यमंत्री स्वत:साठी वारंवार दिल्लीला गेले आहेत. पण महाराष्ट्रासाठी कधीच गेलेले नाहीत”, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्र सोडलं.

“मग राजकारण करायचं कशासाठी?”

दरम्यान, विरोधक राजकारण करत असल्याच्या टीकेचा यावेळी आदित्य ठाकरेंनी समाचार घेतला. “कोविडच्या काळातही ज्यांनी राजकारण केलं, ते आम्हाला आज शिकवतायत की राजकारण करू नका. रोजगाराविषयी बोलणं हे राजकारण असेल तर ठीक आहे, आम्ही राजकारण करतो. पण मग राजकारण कशासाठी करायचं असतं? जर आम्ही प्रश्न विचारले, तर चुकलं कुठे?” असा सवाल आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे.

पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे: भातखळकरांचा पवार, ठाकरेंवर निशाणा; शिवसैनिक म्हणाले, “केंद्रात, राज्यात, पुण्यात BJP सरकार”

“हे सरकार आल्यानंतरच…”

“हेच केंद्र सरकार असताना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आम्ही साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणू शकलो. दावोसमध्ये गेल्यानंतर आम्ही ८० हजार कोटींची गुंतवणूक आणली. पण बेकायदेशीर खोके सरकार आल्यानंतरच अशा गोष्टी कशा घडायला लागल्या?” असाही प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-09-2022 at 17:20 IST
Next Story
महिलेची ५० हजार रुपयांची फसवणूक ; मांत्रिकांविरुद्ध जादुटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल