मुंबई : राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक हाेणार असून महाविकास आघाडीतून कोणाला संधी मिळणार याबाबत चुरस निर्माण झाली आहे. विधानसभेतील संख्याबळानुसारही यंदा शिवसेनेला संधी मिळायला हवी, असा दावा शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

महाविकास आघाडीत राष्ट्रवादीतून(शरद पवार) शरद पवार यांचे नाव चर्चेत असताना आदित्य ठाकरे यांच्या दाव्याने आता नेमकी कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

राज्यसभेसाठी आदित्य ठाकरे यांनी शिवसेनाही (ठाकरे) शर्यतीत असल्याचे सूचक विधान केले. महाविकास आघाडीत राज्यसभेच्या उमेदवारीबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. ज्या चर्चा सुरू आहेत त्या सध्या अफवा आहेत. उमेदवारांबाबत विचार करताना संख्याबळाचा विचार झाला पाहिजे. महाविकास आघाडीतील सूत्रानुसार आता शिवसेनेच्या उमेदवाराची संधी असल्याचे ते म्हणाले.

सध्या महाविकास आघाडीत ठाकरे गटाचे सर्वाधिक २० आमदार आहेत. त्यानंतर काँग्रेसचे १६ तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे १० आमदार आहेत. या संख्याबळानुसार महाविकास आघाडीत केवळ एक उमेदवार विजयी होणार असल्याने या तिन्ही पक्षांकडून काेणाला उमेदवारी दिली जाते याबाबत उत्सुकता आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही यासंदर्भात आघाडीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

उद्धव ठाकरे विधिमंडळात असणे महत्त्वाचे – संजय राऊत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेची मुदत मे महिन्यात संपत आहे. पुन्हा विधान परिषदेवर जाण्यासाठी ठाकरेंना शिवसेनेच्या २० मतांव्यतिरिक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या (ठाकरे) आमदारांच्या मतांचीही आवश्यकता आहे. त्यामुळे राज्यसभेवर दावा करीत विधान परिषदेसाठीही शिवसेनेचा (ठाकरे) प्रयत्न आहे.

राज्यसभेच्या जागेबाबत बोलताना शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी राज्यसभेवरील शरद पवार यांच्या उमेदवारीवरही मत व्यक्त केले. शरद पवार महाविकास आघाडीत आहेत. त्यांच्या पक्षाकडून अजून कोणाचे नाव जाहीर झालेले नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीत आहेत.

आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. शरद पवार यांनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली की मी राज्यसभेसाठी इच्छुक आहे. शरद पवार भाजप सोबत जाणार नाहीत, हे मी खात्रीने सांगतो. काँग्रेसने ती भीती बाळगू नये. उद्धव ठाकरे विधिमंडळात असणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. याबद्दल उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असून महाविकास आघाडी म्हणून ती जागा म्हणून आम्ही लढणार असे ठरले तर एकत्र बसून चर्चा होईल. राज्यसभेच्या जागेवर कोण जाईल याबाबत इतर पक्षांची मते जाणून घेतली जातील, असेही राऊत यांनी सांगितले.