अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. मोर्चात जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी मोठा सहभाग नोंदविला. दुपारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीपासून विविध घोषणा देत निघालेल्या मोर्चाचे जिल्हा परिषद येथे सभेत रुपांतर झाले.
३० एप्रिल २०१४ रोजी शासकीय आदेशानुसार अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दरमहा ९५० रुपये, मदतनीसांच्या मानधनात ५०० रुपये व मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात ५५० रुपये वाढ देण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार ही मानधन वाढ देण्यात यावी. अंगणवाडी सेविका व मदतनिसांना दिवाळीपूर्वी एक हजार रुपये ही २०१४ ची भाऊबीज भेट तत्काळ द्यावी, सुधारित दरानुसार अंगणवाडी सेविकांना ५ हजार रुपये, मदतनिसांना अडीच हजार रुपये, तर मिनी अंगणवाडी सेविकांना ३ हजार २५० रुपये मानधन दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत देण्यात यावे, सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका व मदतनीसांना पेन्शनचा लाभ द्यावा, मयत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वारसांना विमा मिळवून द्यावा, प्रलंबित इंधन, प्रवास व दैनिक भत्त्याची व्यवस्था करावी, अंगणवाडी पर्यवेक्षिकांमार्फत एम.पी.आर. बठकीत दरमहा अंगणवाडी कार्यकर्तीच्या देयकाचा आढावा देण्यात यावा आदी मागण्यांबाबत प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख, राज्य सचिव प्रभावती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
पाण्यासाठी आशा कार्यकर्त्यांची तारांबळ
विविध मागण्यांसाठी निघालेल्या भर दुपारच्या मोर्चात सहभागी झालेल्या काही आशा कार्यकर्तीसोबत त्यांची लहान मुले होती. उन्हामुळे या मुलांचा ओरडा सुरू होता. मोर्चा जिल्हा परिषद येथे दाखल झाला. मोर्चास प्रदेशाध्यक्ष देशमुख मार्गदर्शन करीत असताना यातील काही अंगणवाडी कार्यकर्त्यां पाण्याच्या शोधासाठी बाटली घेऊन भटकंती करताना दिसून आल्या.