प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी हायटेक प्रचाराची राळ उडवली असतानाच आम आदमी पक्षाचे उमेदवार नंदू माधव यांनी दररोज ३०-४० गावांचा दौरा करीत आम आदमीच्या आठवडी बाजारातच प्रचाराचा तंबू उभारला आहे. रोज ३-४ किमान आठवडी बाजारांत जाऊन ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांबरोबर बाजारातीलच व्यापाऱ्यांच्या तंबूत ठाण मांडत, पक्षाची भूमिका मांडणारे नंदू माधव गावागावात चच्रेचा विषय झाले आहेत.
भाजप नेते गोपीनाथ मुंडे, राष्ट्रवादीचे सुरेश धस या प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवारांचा प्रचार मुख्यत्वे मेळावे व जाहिरातबाजीने सुरू आहे. दोन्ही उमेदवार माध्यमांतूनही दिसू लागले आहेत. मात्र, या दोघांबरोबर आपचे उमेदवार अभिनेते नंदू माधव यांनी पक्षाच्या नावाप्रमाणेच प्रचारातही आम आदमीलाच केंद्रस्थान केले आहे. झोकून दिलेल्या कार्यकर्त्यांची फौज बाळगून साधारण गल्ली व गाव ते िपजून काढत आहेत. स्वखर्चाने प्रचारात उतरलेल्या कार्यकर्त्यांची संख्या इतर पक्षांच्या तुलनेत कमी दिसत असली, तरी परिणामकारक निश्चित आहे.
शहरातील गल्लीबोळाप्रमाणेच माधव यांनी आठवडी बाजाराला प्रचाराचे तळ बनवले आहे. रोज ३०-४० गावात फिरताना आठवडी बाजार असलेल्या ३-४ ठिकाणी जाऊन सामान्य माणसांना ते भेटत आहेत. बाजारात वेगवेगळया गावांतून लोक येत असतात. सामान्य स्थितीतील या मतदारांना लोकसभेचा उमेदवार भेटणे अपवादच. मात्र, थेट बाजारात व्यापाऱ्यांच्याच तंबूत बसून पक्षाची भूमिका सांगत स्वच्छ प्रशासनासाठी मत देण्याचा आग्रह माधव यांच्याकडून धरला जातो. या आगळ्या प्रचाराने लोकही मोठय़ा संख्येने गोळा होतात. उमेदवाराबाबत अप्रूप वाटते आणि बाजारातून गावात जाताच नंदू माधव यांची चर्चा घरापासून चावडीपर्यंत सुरू होते.
इतर पक्षांच्या तुलनेत अत्यंत साधारणपणे सुरू असलेला प्रचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यास मात्र यशस्वी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. सामान्य माणसांत ‘घोटाळ्यां’चे मोठे आकडे ऐकून राजकीय पुढाऱ्यांबद्दल मनात राग आहे. या पुढाऱ्यांच्या प्रचाराची हायटेक पद्धत व वेगही वेगळाच असतो. कायकर्त्यांमार्फत गाडय़ा पाठवणे, कार्यकर्त्यांनी आपले लाभार्थी व िहतचिंतक असलेल्यांना गाडय़ांतून कार्यक्रमाला आणणे, गर्दी जमवणे, जाण्या-येण्यापासून खाण्या-पिण्यापर्यंत व्यवस्था करीत लाखो रुपयांचा चुराडा केला जातो. इतर खíचक माध्यमातूनही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी यंत्रणा वापरली जाते. परंतु नंदू माधव यांनी पक्षाच्या नावाप्रमाणेच सुरू केलेला प्रचार व केंद्रित केलेला आम आदमी भविष्यात किती परिणामकारक ठरतो, याची उत्सुकता आहे.
माधव यांच्या प्रचारासाठी मेधा पाटकर यांची सभा झाली. आता अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मदानात येणार आहे. मराठी चित्रपटातील इतरही दिग्गज येण्याची शक्यता असून, आपचे अरिवद केजरीवाल यांनाही बीडला प्रचारासाठी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.