महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने आरे कारशेड प्रकल्पाला परवानगी दिली आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा आरे प्रकरणावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. उद्या काही पर्यावरण प्रेमी याठिकाणी आंदोलन देखील करणार आहेत. याच मुद्द्यावरून संवाद साधताना भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. “उद्धव ठाकरे यांना बनवाबनवी करण्यात नोबेल पुरस्कार मिळू शकतो,” अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.

मुंबई मेट्रो प्रकल्पाबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, “येत्या सहा ते सात महिन्यात आरे कारशेड प्रकल्पाचं काम पूर्ण होऊ शकतं. त्यामुळे वर्षभरात मुंबईत मेट्रो देखील धावायला सुरुवात होईल. परिणामी मुंबईल लोकलवरील बराचसा भार कमी होईल,” असंही सोमय्या म्हणाले.

उद्धव ठाकरेंवर टीका करताना सोमय्या म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांना बनवाबनवी करण्यात नोबेल पुरस्कार मिळू शकतो. त्यांनी केवळ आरे कारशेडचं काम बंद पाडलं नाही, तर त्यामुळे बाकीची कामं देखील ठप्प झाली. दरम्यानच्या काळात मेट्रोचे डबे बनवणाऱ्या कंपन्यांनी करार रद्द केले. तर कर्ज वितरीत करणाऱ्या संस्थांनी देखील हात आखडता घेतला. पण महाराष्ट्रात आता एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकार आलं आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामांना गती मिळणार आहे,” असंही ते म्हणाले.

त्यांनी पुढे बोलताना म्हटलं की, दरवर्षी मुंबईत बांधकामांची अनेक कामं होत असतात. गेल्या २५ वर्षांत मुंबई महापालिकेत ठाकरेंची सत्ता आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी किती झाडं तोडण्यास परवानगी दिली. उद्धव ठाकरे उल्लू बनवण्याचे धंदे करतात. मुंबईत कोस्टल रोड बनवत असताना शेकडो झाडं तोडली गेली. उद्धव ठाकरेंचा अहंकार आणि गोरगावच्या खासगी बिल्डरमुळे हे काम बंद पाडलं होतं, , असा आरोपही किरीट सोमय्या यांनी यावेळी केला.