Abdul Sattar Ambadas Danve Meet Viral Video : “भाजपाकडून लहान-मोठ्या जागांवर ताबा मिळवला जात असून भाजपाने आमचं मुंडकंच छाटलंय” असं म्हणत शिवेसना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दोन्ही शिवसेनेने आता एकत्र यायला हवं, अशी हाक दिली होती. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेनेच्या एकत्र येण्याबाबत केलेल्या विधानानंतर अब्दुल सत्तारांनी हे विधान केलं होतं. दरम्यान, या विधानाची राज्यभर चर्चा झाल्यानंतर आज सकाळीच हे दोन्ही नेते समृद्धी महामार्गवर भेटले आणि दोघांनीही गळाभेट घेतली. त्यांची ही भेट आज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निमित्ताने महायुतीतील बेबनाव उघड झाला. या निवडणुकीच्या उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात चढाओढ पाहायला मिळाली. त्यातच छत्रपती संभाजीनगर येथे भाजपाने सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली. इथे अब्दुल सत्तार यांचे सुपूत्र समीर सत्तार इच्छूक होते. परंतु, सुहास शिरसाट यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने समीर सत्तारांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडला. एवढंच नव्हे तर, अब्दुल सत्तारांनी संतापाच्या भरात अनेक माध्यमांना मुलाखती देऊन भाजपावरील राग व्यक्त केला. “मोठा भाऊच आम्हाला संपवायला निघालाय”, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
अब्दुल सत्तार नेमकं काय म्हणाले होते?
शिवसेना पक्ष तोडण्याचा कार्यक्रम सुरू आहे. हात तोडायचे, पाय तोडायचे असं हळूहळू सुरू असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी आज केला होता. या दाव्यावर अब्दुल सत्तार म्हणाले, “आमचं तर मुंडकंच तोंडून टाकलं. अनेक वर्षांची असलेली आमची जिल्हा परिषद गेली. महापालिकेतील सत्ता संपली. आता राहिलं काय? लहान मोठ्या जागांवर भाजपा जागा बळकावत आहे. शिवसेनेत दोन भाग करायचे, एकाला हाताशी धरायचं आणि दुसऱ्यावर अन्याय करायचा. दुसऱ्याला धरायचं अन् तिसऱ्यावर अन्याय करायचा. अशा पद्धतीने आमचा मोठा भाऊ आम्हाला संपवत असेल तर त्याला इलाज नाही. “
दरम्यान, अंबादास दानवे यांनी दोन्ही पक्षांनी एकत्र यावं, असंही आवाहन केलं होतं. त्यावर अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिलं की, “मलाही वाटतं की आता दोन्ही शिवसेना पक्षांनी एकत्र यायला हवं. आमच्या नेत्यांनी, म्हणजे एकनाथ शिंदे यांनी जर एकत्र येण्याचा निर्णय घेतला, तर कोणालाही विचारण्याची गरज उरणार नाही. एका मिनिटांत आम्ही तयार होऊ. माझा नेता जो निर्णय घेईल, तो मला पूर्णपणे मान्य असेल”, असे त्यांनी म्हटलं.
दोन्ही शिवसेनेने एकत्र यावं, अशी मागणी दोन्ही शिवसेनेतील नेत्यांनी केल्याने राज्यभरात या वक्तव्यांची चर्चा रंगली होती. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्याकरता अब्दुल सत्तार मुंबईला येत होते. त्यावेळी त्यांची भेट अंबादास दानवे यांच्याशी झाली. समृद्धी महामार्गावर झालेल्या या भेटीदरम्यान त्यांना एकमेकांना दिलखुलास अलिंगनही दिलं. त्यामुळे एकमेकांच्या विरोधात ठाकलेले हे नेते एकत्र दिसल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या.
