देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात Gen Z आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे CJP अर्थात कॉक्रोच जनता पार्टीनं SIR प्रक्रियेविरोधात जोरदार आंदोलन सुरू केलेलं असतानाच दुसरीकडे विरोधकांनीदेखील या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाला घेरायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर सीजेपीनं १० ऑक्टोबरला जंतरमंतरवर ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोठ्या आंदोलनाची हाक दिलेली असताना महाराष्ट्रात चंद्रपुरातल्या काही तरुणांना या आंदोलनाला न जाण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्याचा मोठा दावा अभिजीत दिपके यांनी केला आहे. तसेच, महाराष्ट्र पोलिसांवर टीकाही केली आहे.
येत्या १० ऑक्टोबर रोजी सीजेपीनं दिल्लीत पुन्हा एकदा मोठ्या आंदोलनाची हाक दिली आहे. त्यासाठी मोठ्या संख्येनं तरुण पिढी दाखल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातूनदेखील या आंदोलनासाठी तरुण जाण्याची शक्यता असून त्यासंदर्भात अभिजीत दिपकेंनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठा दावा केला आहे. चंद्रपूर पोलिसांनी तिथल्या काही स्थानिक तरुणांना नोटिसा बजावल्याचं ते म्हणाले. यावेळी त्यांनी पोलिसांनी बजावलेल्या नोटिसादेखील पत्रकार परिषदेत दाखवल्या.
महाराष्ट्र पोलिसांनी आमचं मन दुखवलंय – अभिजीत दिपके
अभिजीत दिपकेंनी यावेळी चंद्रपूर पोलिसांवर टीका केली. “काल आमच्या काही स्वयंसेवकांना चंद्रपूर पोलिसांकडून काही नोटिसा आल्या आहेत. त्यात म्हटलंय की तुम्ही जंतरमंतरवरच्या आंदोलनाला जाऊ नये. याशिवाय माहिती मागितलीये की तुम्ही जंतरमंतरला दिल्लीला जाणार आहात तर त्याचा खर्च कोण करणार आहे? त्याशिवाय आंदोलन हिंसक होणार आहे असंही त्यात म्हटलंय. चंद्रपूर पोलिसांना कसं माहिती की आंदोलन हिंसक होणार आहे? की यांनी आधीच काहीतरी प्लॅन करून ठेवलाय?” असा सवाल अभिजीत दिपकेंनी उपस्थित केला आहे.
“आम्ही गांधी-आंबेडकरांबद्दल बोलतो हे हिंसक वाटतं का?”
“सोशल मीडियावर अशा पोस्ट टाकू नका ज्यामुळे हिंसा होईल असंही नोटीसमध्ये म्हटलंय. मला एक व्हिडिओ दाखवा जिथे आमच्याकडून असं काही बोलण्यात आलंय. आम्ही वारंवार गांधी, आंबेडकरांबाबत बोलतोय. तुम्हाला हे हिंसक वाटतंय का?” असा प्रश्नदेखील त्यांनी चंद्रपूर पोलिसांना विचारला आहे.
मुलं दीड हजाराचं तिकीट काढू शकत नाहीत का?
दरम्यान, आंदोलनाला जाणाऱ्या मुलांना दिल्लीपर्यंत जाण्याचे पैसे कुठून आले? असा प्रश्न विचारण्यावरून दिपकेंनी संताप व्यक्त केला आहे. “महाराष्ट्र पोलीस दिल्ली पोलिसांसारखं का वागतायत? महाराष्ट्रातून एखादा मुलगा दिल्लीत आंदोलनासाठी जात असेल, तर तो हजार-दीड हजाराचं तिकीट काढू शकत नाही का? आंदोलनाला जाऊ नका हे कसं म्हणता तुम्ही? पोलिसांची नागरिकांवर मालकी आहे का? आम्ही देशभरात तुम्ही वाहवा करतोय. दिल्ली पोलिसांना सांगतो की तुम्ही महाराष्ट्र पोलिसांकडून शिका. पण इथे महाराष्ट्र पोलिसच आपल्या राज्याला अपमानित करण्यासारखं कृत्य करत आहेत”, अशा शब्दांत अभिजीत दिपकेंनी संताप व्यक्त केला आहे.
“आदिवासी तरुणांच्या बाबतीतच असं का?”
“काल मुंबईत आदिवासी मुलांच्या मोर्चाचं नेतृत्व राहुल पावरा करत होता. त्या आदिवासी विद्यार्थ्यांवरही मुंबई पोलिसांनी दडपशाही केली. त्यांना मारहाण करण्यात आली. तुमच्याकडे गुन्हेगार कमी झाले आहेत का? अंबानीचा मुलगा जर रस्त्यावरून जात असेल, तर तुम्ही त्याला मारलं असतं का? पकडलं असतं का? आमदारांचे-खासदारांचे मुलं मोर्चा घेऊन जात असते, त्यांच्यासोबतही असंच वागले असते का पोलीस? मग या आदिवासी तरुणांच्या बाबतीतच असं का?” अशा शब्दांत अभिजित दिपकेंनी पोलिसांना जाब विचारला आहे.
