नीट पेपरफुटी प्रकरणी जेन झीच्या आंदोलनाला पाठबळ देणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीला धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे मोठं यश मिळालं. या पक्षामुळे देशात सरकारसमोर प्रेशर ग्रुप तयार झाला. आता हाच ग्रुप पुढे जाऊन राजकीय पक्ष बनणार का? या पक्षाकडून निवडणुका लढवल्या जाणार का? असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून विचारला जातोय. यावर कॉक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके सडेतोड उत्तर दिलंय. ते एबीपी माझाच्या मुलाखतीत बोलत होते.
देशातील संस्थांवरचा विश्वास उडाला
कॉक्रोच जनता पक्षाचं पुढे काय होणार? निवडणुका लढवणार का? असा प्रश्न विचारल्यानंतर अभिजीत दिपके यांनी म्हटलं, “कन्फुजन कोणतंच नाहीय. पॉलिटिकल प्रेशर ग्रुप म्हणून काम करणार आहोत. नागरिकांचा देशातील संस्थांवरचा विश्वास उडत चालला आहे. मग, निवडणुका लढवून तुम्ही करणार काय? सकाळी ज्यांना मत देता, संध्याकाळी तो आमदार दुसऱ्या पक्षात गेलेला असतो.”
लोकशाही उलट झालीय
“एकेकाळी मतदार ठरवायचे की सरकार कोणाचं येईल. पण मागच्या लोकसभेपासून सरकार ठरवतंय की मतदार कोण असेल?” “, असं म्हणत अभिजीत दिपके यांनी एसआयआर प्रक्रियेवर टीका केली. ते पुढे म्हणाले, “लोकशाही उलट झाली आहे. अशा वातावरणात राजकीय पक्ष घेऊन तुम्ही करणार काय?”
पाच वर्षांनी मी आऊटडेटेड होणार
आता जे प्रेशर निर्माण केलं आहे ते दिर्घकाळ राहील का? असा प्रश्न विचारल्यावर अभिजीत दिपके म्हणाले, “जितके जास्त प्रेशर ग्रुप बनतील ते चांगलंय. पाच वर्षांनी मीही आऊटडेटेड होऊन जाईल. पाच वर्षांनी सीजेपी आऊटडेटेड होईल, ते लोकशाहीसाठीही चागंलं. सीजेपीमध्ये कोणी फुटलं नाही पाहिजे. पण पक्षातील लोक फुटणार असते ते गेल्या महिन्याभरातच फुटले असते. कारण आम्हाला अनेक धमक्या आल्या होत्या. भाजपा येण्यासाठीही धमक्या आल्या होत्या”, असा दावाही त्यांनी केला. “२७ व्या वर्षी सौरव दास केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांबरोबर बसून निगोसिएशन करतो, हे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत होतं”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
