विरोधी पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याविरोधात येत्या ०६ ऑक्टोबर रोजी दिल्लीत विरोधी पक्षांच्या वतीने मुख्य निवडणूक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, त्याआधी आज (दि. ०२ ऑक्टोबर) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJP च्या वतीने मुंबईत शिवाजी पार्कच्या गेट क्रमांक ६ येथे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला परवानगी नसली, तरी अजिबात मागे हटणार नसल्याचे दिपके यांनी स्पष्ट केले.
आंदोलन कधीपर्यंत सुरू राहणार?
याच पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पत्रकार परिषद घेत सरकार आणि मुख्य निवडणूक आयुक्तांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू होत असून, देशभरात विविध ठिकाणी हे आंदोलन होणार आहे. दिल्लीतील जंतर मंतरवरही हे आंदोलन होणार असून, जोपर्यंत ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील,” अशी घोषणा अभिजीत दिपके यांनी केली.
ज्ञानेश कुमार हे देशाचे गद्दार
पुढे ते म्हणाले, “२०२९ च्या निवडणुकीत ‘जेन झी’ (Gen Z) मतदारांची संख्या सर्वाधिक असणार आहे. त्यांना कसा देश हवा आहे, तसा तो देणे आपली जबाबदारी आहे. लोकशाहीत जनता सरकार ठरवते, पण इथे सरकारच आपले मतदार कोण असावेत हे ठरवत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे देशाचे गद्दार असून, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचे पपेट (कठपुतळी) आहेत,” असा घणाघात अभिजीत दिपके यांनी केला.
दिपके आंदोलनावर ठाम अन् फडणवीसांना इशारा
“आमच्या मुंबईतील आंदोलनाला परवानगी मिळो अथवा न मिळो, आंदोलन होणारच,” असा निर्धार व्यक्त करत दिपके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. परवानगी नसताना आंदोलन केल्यास तीन दिवस तुरुंगात राहावे लागेल, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्याबाबत विचारताच, “मतदानाच्या हक्कासाठी तीन दिवस काय, तीन महिने तुरुंगात काढायला तयार आहे,” असे आव्हान दिपके यांनी दिले. ते म्हणाले, “ब्रिटिशांनी गांधीजींच्या आंदोलनाला परवानगी दिली नव्हती, तरीही त्यांनी लढा दिला. शिवाजी पार्कवर फडणवीस रॅली काढू शकतात, मग आम्हाला तिथे आंदोलन करायला परवानगी का नाही? मला ३ दिवस नाही तर ३ महिने जेलमध्ये ठेवा, मी बाहेर येऊन पुन्हा रस्त्यावर उतरून संघर्ष करेन; मी पुन्हा येईन, पुन्हा येईन!” असा इशारा त्यांनी दिला.
