मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत आंदोलनासाठी निघालेले ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांना पोलिसांनी विमानातूनच ताब्यात घेतले. त्यामुळे आजीच्या निधनाची बातमी मिळूनही अभिजीत यांना अंत्यसंस्काराला हजर राहता आले नाही. या दुःखद घटनेनंतर त्यांच्या आई अनिता दिपके यांनी दिल्ली पोलिसांच्या वागणुकीबद्दल खंत व्यक्त केली आहे.
विमानातूनच थेट ताबा; दिवसभर संपर्कही तुटला
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत १० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. तरीही आंदोलनावर ठाम असलेले अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास हे दिल्लीत पोहोचताच पोलिसांनी त्यांना विमानातूनच ताब्यात घेतले. अटकेनंतर संपूर्ण दिवसभर या तिघांचाही कुटुंबीयांशी कोणताही संपर्क होऊ दिला गेला नाही. रविवारी सकाळी त्यांना विशेष कार्यकारी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
अंत्यदर्शनाला नातू पोहोचूच शकला नाही
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी या मूळ गावी अभिजीत यांच्या ८५ वर्षीय आजी सावित्रीबाई दिपके यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. आजीच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर अभिजीत तात्काळ गावी पोहोचतील, अशी आशा कुटुंबीयांना होती. मात्र, दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे ते वेळेत पोहोचू शकले नाहीत.
अखेर नातवाच्या अनुपस्थितीतच संतुक पिंपरी येथील स्मशानभूमीत सावित्रीबाई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अशा कठीण काळात मुलगा आजीच्या शेवटच्या दर्शनालाही उपस्थित राहू शकला नाही, ही वेदना बोलून दाखवताना आई अनिता दिपके भावुक झाल्या. “त्याला आजीचे अंत्यदर्शनही घेता आले नाही; याचं खूप वाईट वाटतयं, हे आमच्या आयुष्यभर लक्षात राहील” अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली.
“आंदोलन न करण्याच्या बाँडवर सही केलीच नाही”; सुटकेनंतर अभिजित दिपकेंची सूचक पोस्ट
वर्षभराच्या शांतता करारावर स्वाक्षरी केल्यामुळे आता आंदोलन थांबणार का, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, सुटकेनंतर सोशल मीडियावर सूचक पोस्ट करत अभिजीत दीपके यांनी सर्व अटकळ फेटाळून लावल्या आहेत. पोलिसांनी कोणत्याही अटींवर सही करून घेतलेली नाही, त्यामुळे निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी आणि आंदोलन पुढेही सुरूच राहील, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
