Ramdas Athawale offer to Abhijit Dipke: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना भाजपाप्रणीत एनडीएमध्ये येण्याचा प्रस्ताव केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. सोमवारी माध्यमांशी बोलत असताना रामदास आठवले यांनी दिपके यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर आमच्या पक्षात सामील व्हा, असे आठवले म्हणाले. दरम्यान दिपके यांनी आठवले यांच्या प्रस्तावावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. अभिजीत दिपके यांनी राजकारणात उतरण्याबाबत यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली होती. लोकांचा राजकारण आणि पुढाऱ्यांवरून विश्वास उडाला असल्यामुळे आपण राजकारणात न जाता दबाव गट म्हणून कार्यरत राहू, असे ते म्हणाले होते.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले काय म्हणाले?
सोमवारी माध्यमांशी बोलत असताना रामदास आठवले म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आरपीआय (अ) मध्ये सामील व्हावे. यामुळे समाज आणि पक्षाला बळकटी मिळू शकते.” रामदास आठवले यांचा आरपीआय पक्ष हा एनडीएचा घटक पक्ष आहे. त्यामुळे आठवले यांनी दिपके यांना आपसूकच एनडीएमध्ये येण्याचे आवाहन केले आहे.
आठवले म्हणाले, “अभिजीत दिपके हा आंबेडकरवादी आहे. तो तरुण असून चांगला कार्यकर्ता आहे. त्याने आरपीआय पक्षात येण्याचा विचार करायला हवा.”
कॉकरोच जनता पार्टीने नीट पेपरफुटीविरोधात जून आणि जुलै महिन्यात दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे २५ जुलै रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला होता. या आंदोलनाचा दाखला देताना आठवले म्हणाले की, जे लोक चुकीचे काम करतात त्यांना शासन करणे सरकारचे कामच असते. पेपरफुटी प्रकरणी सरकारने कडक कारवाई केलेली आहे. त्यामुळे दिपके यांनी आमच्या पक्षात यावे.
‘दिपकेंना युवक संघटनेची जबाबदारी देऊ’
अभिजीत दिपके तरूण असून त्यांच्यामुळे आरपीआय पक्षाला नवी उभारी मिळू शकते. त्यांनी जर आरपीआयमध्ये येण्याचा निर्णय घेतला तर आम्ही त्यांना युवक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्षपद देऊ, असेही विधान रामदास आठवले यांनी केले.
रामदास आठवले यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही एनडीएमध्ये सामील होण्याचे आवाहन केले. वैचारिक मतभेद असू शकतात पण राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने एनडीएत येण्याचा विचार करावा. यामुळे त्यांच्या विकासाच्या प्रयत्नांना आणखी बळकटी मिळण्यास मदत होईल. जर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सत्ताधारी एनडीएत सामील होण्यास नकार दिला. तर त्यांच्या आठ खासदारांनी स्वतंत्रपणे एनडीएमध्ये सहभागी होण्याचा विचार करावा, असेही ते म्हणाले.
‘अमेरिका से आया छुपके छुपके’
अभिजीत दिपके यांनी आरपीआयमध्ये यावे, असे आवाहन रामदास आठवले आता करत असले तरी काही दिवसांपूर्वी त्यांनी दिपकेंवर शीघ्रकविता केली होती. राज्यसभेत बोलत असताना आठवले म्हणाले, “अमेरिका से भारत आया छुपके छुपके, उसका नाम अभिजीत दिपके.”
?? Indian Parliament ?
— Ajay Kashyap (@EverythingAjay) July 31, 2026
"America Se Aaya Chupke Chupke
Uska Naam Abhijeet dipke" ?? pic.twitter.com/ImRYLkavHq
रामदास आठवले पुढे म्हणाले, “अभिजीत दिपके यांनी उगाच आंदोलन उभे केले, तरीही सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या आहेत. त्यांनी २०-२५ दिवस आंदोलन केले. तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर बळाचा वापर केला नाही. मात्र २० जुलै रोजी ते संसदेत चालून येत होते, म्हणून पोलिसांनी बळाचा वापर केला. पण पोलिसांच्या कारवाईचेही मी समर्थन करत नाही. दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी.”
