‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या आजीचे हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी गावात वृद्धापकाळाने निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे खालावली होती. एकीकडे कुटुंबावर शोककळा पसरली असताना, दुसरीकडे अभिजीत दिपके हे दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असल्याने ते अंत्यसंस्कारासाठी गावी पोहोचू शकतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
विमानतळावरच दिल्ली पोलिसांची कारवाई
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आयोजित आंदोलनात सहभागी होण्यासाठी अभिजीत दिपके मुंबईहून दिल्लीला गेले होते. मात्र, दिल्ली विमानतळावर उतरताच दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आंदोलन तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने ही खबरदारीची कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.
रविवारी सकाळी १० वाजता होणार अंत्यसंस्कार
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या आजी सावित्रीबाई दिपके (वय ८५) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या, रविवारी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. हिंगोली शहरानजीक असलेले संतुक पिंपरी हे अभिजीत दिपके यांचे मूळ गाव आहे. या ठिकाणी त्यांचे काका विलासराव दिपके राहतात आणि त्यांच्याकडेच अभिजीतच्या आजी सावित्रीबाई दिपके राहत होत्या.
अभिजीत दिपके हे नेमके शनिवारीच दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेले असताना त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, अभिजीतचे आई-वडील छत्रपती संभाजीनगर येथून संतुक पिंपरीकडे दुपारी रवाना झाले असल्याचे दिपके यांच्या नातेवाईकांनी सांगितले. अलीकडेच दिपके हिंगोलीत आले असता त्यांनी गावी जाऊन आजीची भेट घेतली होती.
