अभिजीत दिपके हे दिल्लीहून मुंबईत आले आहेत. त्यांनी मुंबईत उतरताच आंदोलन करणारच असा नारा दिला आहे. तसंच दिल्ली पोलिसांनी मुळीच माणुसकी दाखवली नाही असा आरोप केला आहे. तसंच दिल्ली पोलिसांमध्ये गुंड आहेत, त्यांच्याकडे माणुसकी नावाची गोष्ट नाही असंही अभिजीत दिपके म्हणाले आहेत. आम्ही या कुणाच्या हुकूमशाहीला घाबरणार नाही असंही दिपके यांनी म्हटलं आहे.

अभिजीत दिपके काय म्हणाले?

“दिल्ली पोलिसांनी मला सांगितलं की तुझी आजी गेली आहे. मला पहाटे ३.३० ला त्यांनी ही बातमी दिली. मला म्हणाले तुझ्या आई वडिलांशी आम्ही तुझं बोलणं करून देतो. पहाटे ३.३० ला आई वडिलांशी बोलणं करून द्यायचं कारण काय? मी त्यांना सांगितलं मला माझ्या भावाशी बोलायचं आहे ते बोलू द्या, मला फोन द्या त्यांनी नाही दिला. त्यांना सांगितलं की ठीक आहे वकिलांशी बोलतो मला फोन द्या त्यांनी फोन दिला नाही. आजी वारल्यानंतर दिल्ली पोलीस म्हणाले की तुमच्या आई वडिलांना फोन करून सांगा की तुम्हाला अटक झाली आहे. हा भीती निर्माण करण्याचाच प्रयत्न होता. मी जेव्हा दुपारी सांगितलं तेव्हा त्यांनी भावाशी बोलू दिलं नाही. मी दोनच मिनिटांसाठी माझा फोन मागितला पण मला फोन त्यांनी दिला नाही. वकिलांशी बोलू दिलं नाही.” असा आरोप अभिजीत दिपकेंनी दिल्ली पोलिसांवर केला आहे.

लवकरच रस्त्यावर उतरणार आणि आंदोलन करणार-दिपकेंची घोषणा

आंदोलनाबाबत विचारलं असता अभिजीत दिपके म्हणाले, आम्ही कुणालाही काहीही लिहून दिलेलं नाही. लवकरच रस्त्यावर उतरणार आणि आंदोलन करणार आहोत. आजी वारली आहे म्हणून मी दिल्लीहून मुंबईत आलो आहे. प्रत्येकाला रस्त्यावर उतरावं लागणार आहे. कारण नरेंद्र मोदी म्हणजे हुकूमशाह आहेत, नरेंद्र मोदी यांची हुकूमशाही संपवावी लागणार आहे. कारण आपण पाहिलं एका ज्ञानेश कुमारला वाचवण्यासाठी संपूर्ण दिल्ली बंद केली. रस्ते बंद केल्या, मेट्रो बंद केल्या, सगळं बंद करून टाकलं. ७०-८० वर्षांच्या इतिहासात असं घडलं नाही. आम्हाला विमानातून ताब्यात घेण्यात आलं, अटक करण्यात आली. आम्ही काय दहशतवादी होतो का? नरेंद्र मोदींना अदाणींना देश विकला आहे, आता जर आंदोलन केलं नाही तर संपूर्ण देश विकून खाईल हा माणूस. अशी टीका अभिजीत दिपकेंनी केली आहे.

नरेंद्र मोदींसारखे हुकूमशाह येतील आणि जातील-दिपके

दिल्ली पोलीस आंदोलकांना उचलत आहेत, मारहाण करत आहेत उद्या नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना खुश करण्यासाठी ते एखाद्या विद्यार्थ्याचा खून करायला सांगितलं तर तो पण करतील का? हा माझा दिल्ली पोलिसांना सवाल आहे. ज्यांच्यावर आरोप झाले आहेत, त्या लोकांचं प्रमोशन करण्यात आलं आहे. एसीपी विवेक भगत यांना अतिरिक्त डीसीपी म्हणून पोस्ट दिली गेली आहे. हेच होतं, जेव्हा देश गुंडांच्या हाती असतो. जेव्हा देश गुंडांच्या हाती असतो तेव्हा गुंडांचं प्रमोशन होतं. मला आणि माझ्या सहकाऱ्यांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेतलं होतं. हे सगळं केल्याने आम्ही घाबरणार नाही. नरेंद्र मोदी यांच्यासारखे हुकूमशहा येतील आणि जातील. पण हा देश वाचवणं महत्त्वाचं आहे, आम्ही त्यासाठी आंदोलन करणारच असं अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे.